१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Tuesday, September 21, 2010

'नपेक्षा'संबंधीच्या दोन बातम्या

('नपेक्षा'संबंधीच्या दोन बातम्या. एकाच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातम्या.
केवळ संदर्भासाठी इथे, जशाच्या तशा. )
-------------------------------------------------------------------------------------------------------------

'नपेक्षा'त साहित्य, संस्कृती, भाषा, परंपरा यांची झाडाझडती
-----------------------
औरंगाबाद, ता. १८: 'नपेक्षा' यापूर्वीच प्रकाशित व्हायला हवे होते. त्यात साहित्य, संस्कृती, भाषा, परंपरा यांची झाडाझडती घेण्यात आली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक अशोक शहाणे यांच्या लेखनावरील चर्चेने वाङ्‌मयीन उंची गाठली.


लोकवाङ्‌मय गृहातर्फे प्रकाशित जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक अशोक शहाणे यांच्या 'नपेक्षा' या लेखसंग्रहाचे प्रकाशन त्या पुस्तकावरील चर्चेने झाले. मराठवाडा साहित्य परिषद व लोकवाङ्‌मयतर्फे झालेल्या या समारंभात साहित्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार प्रा. जयदेव डोळे, रमेश इंगळे उत्रादकर यांनी या संग्रहावर भाष्य केले. दलित साहित्यिक, नेते राजा ढाले अध्यक्षस्थानी होते.

श्री. शहाणे यांच्या लेखनातील विचारांवरील प्रेमामुळे त्यांचे लेखन प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे साहित्यिक सतीश काळसेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. त्यांचे साहित्य आज ग्रंथरूपात नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभीच श्री. शहाणे यांनी आपल्या खास संवादी शैलीत या संग्रहातील लेखनामागील भूमिका सांगितली. ते म्हणाले, की 'फुटकळ', 'सटरफटर' अशी नावे या संग्रहासाठी आपण सुचविली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी 'नपेक्षा' असे बारसे केले. १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मराठी साहित्यावरील 'क्ष-किरण' या लेखाने अनेकांच्या शिव्या मिळाल्या. रोष पत्करावा लागला. साहित्यिक ना. सी. फडके यांनी 'शहाणे यांचे हात कलम करावेत', असे आवाहन केले, ती आठवणही त्यांनी नमूद केली. वादग्रस्त ठरलेल्या लेखांसाठी आपण साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची मदत घेतली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

श्री. डोळे यांनी सांगितले, की श्री. शहाणे यांच्या लेखनातून अनेक गोष्टी शिकता आल्या. वेगळा विचार सांगणारे, मात्र पारितोषिकांच्या रांगेत न उभे राहणारे मोजके लेखक होते. त्यात अशोक शहाणे यांचा समावेश होतो. 'आमच्या पिढीचा अमिताभ' अशा शब्दांत त्यांनी शहाणे यांचा गौरव केला. त्यांनी सुरू केलेल्या 'लिट्ल मॅगझिन' चळवळीचाही श्री. डोळे यांनी आढावा घेतला. त्यांनी आपल्या लेखनात मूल्ये स्वीकारली आहेत. मात्र त्याचा त्यांनी गाजावाजा केला नाही, असेही ते म्हणाले.

श्री. इंगळे यांनी सांगितले, की साहित्य, संस्कृती, भाषा व परंपरा यांची परखड झाडाझडती अशोक शहाणे यांनी घेतली आहे.

अशोक शहाणे यांच्या चळवळीतील लेखक कार्यकर्त्यांत परावर्तित झाले, असे राजा ढाले यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले. साहित्यासोबतच समाजानेही बदलायला हवे, अशी अपेक्षा ठेवून त्यांनी लेखन केले. समाजात आजही छुपा जातीयवाद आहे. समता खरेच प्रस्थापित झाली काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, बाबा भांड, कवी तुलसी परब, ज्येष्ठ नेते ऍड. मनोहर टाकसाळ, प्रा. दत्ता भगत, प्रा. अजित दळवी, अनुया दळवी, प्रा. रमेश दीक्षित आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षात कार्यक्रमात रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहा वाजता परिषदेच्या सभागृहात अशोक शहाणे रसिकांशी संवाद साधणार आहेत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी भाषेचे स्वत्व गमावले, की काय
-----------------------
अशोक शहाणे यांचा प्रश्‍न
-----------------------
औरंगाबाद, ता. १९ : संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, जनाबाई, नामदेव आदींनी दोन-तीन वर्षांत लिहून ठेवलेल्या कवितांची बरोबरी सातशे वर्षांनंतरही होऊ शकली नाही. आपण मराठी भाषेतील स्वत्व गमावून बसलो की काय, अशी भीती ज्येष्ठ लेखक अशोक शहाणे यांनी रविवारी (ता. १९) येथे व्यक्त केली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'साक्षात' कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीपासून समाधीपर्यंतच्या कालखंडातील त्यांच्या रचना, प्रवास, घटना श्री. शहाणे यांनी प्रारंभी उलगडून दाखविल्या. तत्कालीन संतांच्या मराठी रचनेतील काव्याचे काही नमुनेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की ९८५ मधील शिलालेखानंतर मराठीने हजार वर्षांत साध्य केलेली प्रगती मागे वळून पाहायला लावणारी आहे. आज मराठी समाजासमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्ञानोबा, तुकोबा यांनी कल्पिलेला, की शिवाजीराजांनी कल्पिलेला मराठी समाज मानायचा. भाषा हे संस्कृतीचे सर्वांना अभिप्रेत असे रूप आहे. ते मराठीच्या बाहेर जाऊन पाहिले तरच कळू शकते. 'प्रास' या त्यांच्या प्रकाशनसंस्थेने पुस्तकांची निवड करताना काय निकष लावले, या प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले, की भावले, ते प्रसिद्ध केले. ज्ञानपीठ पुरस्कारांत मराठीचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. त्याची कारणे विचारणा-या प्रश्‍नाला त्यांनी मी बक्षिसांबद्दल विचार केलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले, की बक्षिसांचा विषय आला, की मतभेद असतातच.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, प्रा. रवींद्र किंबहुने, श्‍याम देशपांडे, जयदेव डोळे, प्रा. चंद्रकांत भालेराव, रमेश दीक्षित, प्रा. रुस्तुम अचलखांब आदींसह रसिक उपस्थित होते.

Wednesday, September 15, 2010

अशोक द ग्रेट

- मधू साबणे


अशोक शहाणे आणि माझी ओळख माझा कॉलेजमधला मित्र सुभाष गोडबोलेमुळे झाली. त्या दिवशी मी नि सुभाष नेहमीप्रमाणे टिळक रोडच्या बादशाहीत चहा पीत बसलो होतो. तर अशोक तिथं आला नि आमच्या टेबलावर येऊन बसला. मग गप्पांच्या ओघात सत्यकथेचा विषय निघाला. तर अशोक म्हणाला, "तुम्ही सत्यकथाका वाचता?" मी म्हणालो, "मी मास्तर आहे आणि सत्यकथेतला मजकूर पुढे पाठ्यपुस्तकातून धडा म्हणून येतो. तर आधीच ते वाचलेले असलं म्हणजे शिकवायला सोपं जातं. परत मी ग्रामीण भागात काम करतो. त्यामुळे मला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांना शहरी धडे समजत नाहीत." मग अशोक खवचटपणे म्हणाला, "तुमचा सत्यकथावाचण्याचा वारही ठरलेला असेल."
मी ग्रामीण भागात काम करत असल्याने अशा खवचटपणे बोलणार्‍यांची मला सवय होती. तर मी काही त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही. मग अशोकची नि माझी त्या दिवसापासून दोस्ती जमली ती आजतागायत टिकून आहे.
मला अशोक पहिल्यांदा भेटला त्यापूर्वी तो दोनएक वर्षं खरं तर सत्यकथेत बंगाली अनुवादित कथांचा रतीब घालीत होता. भागवत त्याच्या अनुवादावर खूश होते. इतकंच नाही तर अशोकनं मोती नंदीची नक्षत्रांची रात्रही कादंबरी मौज प्रकाशनला दिली होती. ही कादंबरी विरामचिन्हं नसलेली होती. ती एकदम सलग लिहिलेली होती. तर श्री. पु. भागवतांनी नेहमीप्रमाणे आपली संपादकीय तलवार त्यावर चालवली आणि विरामचिन्हं घालून काही संपादकीय संस्कार करून त्यांनी अशोकला बोलावून घेतलं. मग अशोकनं स्क्रिप्ट पाहिलं तर सगळीकडे विरामचिन्हं घातलेली. भागवतांच्या समजुतीप्रमाणे काही कलात्मक बदलांसाठी परिच्छेद पण बदललेले. अशोक खूप अस्वस्थ झाला. तो भागवतांना म्हणाला, "तुम्हाला हे बदल करायची परवानगी कोणी दिली? बदल करण्यापूर्वी मला विचारायचं तरी! ही कादंबरी मी दिली त्या स्वरूपातच तुम्ही छापायला हवी. नाहीतर स्क्रिप्ट परत द्या." त्यावर भागवत पण रागावले. म्हणाले, "या कादंबरीवर मी खूप कष्ट घेतले आहेत. तर तुम्हाला मी परत देणार नाही." त्यावर अशोक म्हणाला, "माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला ती छापता येणार नाही." अशोक निघून गेला. मग बारा वर्षांनी ती कादंबरी अशोकला मौजनं परत केली. पुढे ती कधी छापलीच गेली नाही. आता तर अशोकजवळ त्याचं स्क्रिप्ट पण नाही, पण त्यानंतर काही वर्षांनी अशोकनं माझ्या बाबतीत तसंच वर्तन केलं. माझी लीळाही कादंबरी चक्क सतरा वर्षं पाडून ठेवली आणि २००१ साली त्यानं मला लीळाचं बाड परत केलं. त्याबरोबर एक पत्र पण होतं. पत्रात त्यानं लिहिलं होतं -
मधू,
सरतेशेवटी लीळाचं स्क्रिप्ट. पोचल्याचं कळव.
ते मार्गी लागू दे. सध्या सगळंच विस्कळीत होऊन बसलंय.
त्यातनं काय न् कसा मार्ग काढायचा हा मोठाच प्रश्न आहे.
तपशीलवार परत कधीतरी. तब्येतीला जपून रहा.
- अशोक.

अशोकच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ चाललेली होती. त्यामुळे प्रास प्रकाशनजवळ जवळ ठप्प झालेलं होतं. पण लीळापरत केलं तेव्हा अशोकनं त्यातलं पानन्‌पान जपून ठेवलं होतं. त्यावर प्रेसकडे पाठवण्यावण्यासाठी सर्व संस्कार केलेले होते. त्यामुळे मी ते सुपर्ण प्रकाशनला दिलं, तेव्हा प्रेसकॉपी तयार असल्यानं त्यांनी ते पुस्तक दीडएक महिन्यात बाजारात आणलं. मी अशोकला पुस्तक निघाल्याचं कळवलं. तर तो फोनवर म्हणाला, "पुण्याला आल्यावर प्रत्यक्ष बोलू."
१९६३च्या सुमारास अशोकनं अ. भि. शहा यांच्या फोरम फॉर कल्चरल फ्रीडमया संस्थेत लीटरेचर अ‍ॅण्ड द कमीटमेंटहा इंग्रजीतला पेपर वाचला. त्यावेळी पुण्यातील सगळे बुजुर्ग लेखक आणि संपादक हजर होते. त्यांत किर्लोस्करचे मुकुंदराव किर्लोस्कर हजर होते. पेपर वाचून झाल्यावर मुकुंदराव अशोकला म्हणाले, "तुम्ही हा निबंध मराठीत करून द्या. आम्ही तो मनोहरमध्ये छापू." त्याप्रमाणे अशोकनं तो त्यांना आजकालच्या मराठी साहित्यावर क्ष किरणया नावानं अनुवादित करून दिला. तो लेख मनोहरमध्ये प्रकाशित झाल्यावर पुण्यात एकच हलकल्लोळ माजला. त्यात तत्कालीन प्रस्थापित मराठी लेखकांवर हल्ला चढवलेला होता. त्यामुळे ते सगळे प्रक्षुब्ध झालेले. लेखाच्या शेवटी अशोकनं लोकमान्य टिळक नि त्यांचे गीतारहस्ययाबद्दल अनुदार उद्गार काढले होते. "गीतारहस्य हे किराणा भुसार मालाचं चोपडं आहे", असं म्हटलं होतं. त्यामुळे पुण्यातले टिळकभक्त खूपच खवळले. ना. सी. फडक्यांनी तर केसरीत मोठा लेख लिहून असल्या लेखकाचे हात कलम केले पाहिजेत असं म्हटलं होतं. आताच्यासारखा झुंडशाही माहोल असता तर लोकांनी अशोकच्या घरावर मोर्चे काढले असते. कदाचित अशोकचं घर पण जाळलं असतं. पण फडक्यांनी त्याचा सभ्यपणेच निषेध केला. आणि अशोक एका रात्रीत प्रकाशझोतात आला.
५९-६० साली अशोक टिळक रोडवर चौदा इंच बॉटम असलेली नॅरोपॅण्ट वर लाल रंगाचा शर्ट आणि पायात पुणेरी जोडा अशा वेषात हिंडत असे. टिळक रोड ते जिमखान्यापर्यंत सगळे लोक त्याच्याकडे बघत राहायचे. पण अशोकला त्याचं काही घेणंदेणं नव्हतं.
मग साठ-एकसष्टला अशोक मुंबईत रहायला गेला. त्यावेळी मुंबईत त्याची कुठेच सोय नसल्यामुळे तो माधव वाटवेकडे रहायचा. त्याच वेळी ना. वि. काकतकरांनी आपलं रहस्यरंजननावाचं नवीन मासिक काढलं होतं. त्याच्या कार्यालयात संध्याकाळी दुर्गा भागवत, नेमाडे, नाना काकतकर, रघू दंडवते, वृंदावन दंडवते असे बरेच जण असायचे. त्याच वेळी अशोकनं अथर्वचा पहिला अनियतकालिक अंक काढला. त्याची मुंबईच्या साहित्य वर्तुळांत खूप चर्चा होती. काहींना तर वाटलं, हा सत्यकथेला पर्याय देखील असू शकेल. त्यातली रघू दंडवतेची मावशीही कथा नि अशोकची एका गांडूचे गार्‍हाणेही कविता खूप गाजली. त्यावरून एक आठवण झाली. मी नि अशोक नेहमीप्रमाणे डेक्कनवर फिरायला गेलो, नि चहा प्यायसाठी गुडलकवर गेलो, तर तिथं ग. रा. कामत आणि पु. भा. भावे बसलेले होते. कामत अशोकला ओळखत होते. तर त्यांनी अशोकला बोलावलं. मग त्यांच्या टेबलावर जाऊन बसलो. कामतांनी भाव्यांना ओळख करून दिली, “हे अशोक शहाणे.” तर भावे पटकन् म्हणाले, “म्हणजे गांडूचं गार्‍हाणंवाले का?” कामत म्हणाले, “हो”. तर भावे परत म्हणाले, “अरे, याचं कुणीतरी लग्न लावून द्या रे! म्हणजे हा परत असं लिहिणार नाही.”
रहस्यरंजनबंद पडलं. त्याबरोबर अथर्वसुद्धा बंद पडलं. त्याचा फक्त पहिलाच अंक निघाला. मग अशोक परत पुण्याला आला. या दोन वर्षांत मुंबईत असताना अशोक माधव वाटवेबरोबर रंगायनच्या तालमी चालायच्या तिथं जायचा. अशोक त्याच्या नेहमीच्या स्लँग भाषेत बोलायचा. तर तिथं तालमीला येणार्‍या तरुण मुलांनी तसंच बोलायला सुरुवात केली. हे मेहताबाईंना आवडायचं नाही. एक दिवस त्या चक्क अशोकला म्हणाल्या, “शहाणे, तुम्ही इथं येत जाऊ नका. माझ्या मुलांची भाषा तुमच्यामुळे बिघडली.” मग अशोक परत तिथं कधी गेला नाही.
अशोक पुण्यात टिळक रोडवर त्या वेळचे प्रसिद्ध समीक्षक अश्लील मार्तंडमराठे यांच्या वाड्यात राहायचा. मी पण त्या वेळी भिकारदास मारुतीसमोर रहायचो. त्यामुळे टिळक रोडवर कधी जीवनरेस्टॉरंटवर तर कधी बादशाहीत आणि पानाच्या ठेल्यावर गाठ पडायची. एक दिवस अशोक मला म्हणाला,“सध्या मी परत नवीन अनियतकालिक सुरू करतोय.”
पण नाव काय?”
असोअशोक म्हणाला.
मी म्हणालो,“ठीक आहे. पण आपल्याला भरपूर वर्गणीदार मिळवायला हवेत. वर्गणी काय ठेवणार?”
अरे, आपण टपाल खर्च म्हणून लोकांकडून फक्त वर्षाचे एक रुपया ऐंशी पैसे वर्गणी घ्यावयाची आहे. म्हणजे आपला टपाल खर्च भागेल.” मी म्हणालो,“चांगली कल्पना आहे. मी वर्गणीदार गोळा करायला सुरुवात करतो.” आणखीन मग आमच्या मदतीला नाना काकतकर, भैय्या जोशी, बलदोटा, देविदास बागूल असे बरेच लोक होते. नेमाडे त्या वेळी औरंगाबादला होतात्यानं चंद्रकांत पाटील, किंबहुने यांना मदतीला घेऊन बरेच वर्गणीदार गोळा केले. चौसष्टच्या सुरुवातीला असोचा पहिला अंक निघाला. तो लहान पुस्तकाच्या आकाराचा होता. त्यात आरध्ये यांच्या फेराकादंबरीतला उतारा, माधव वाटवेची पांघरुणही कथा होती. हे अंक माधवराव पटवर्धनांच्या संगम प्रेसमध्ये अशोक छापायचा पण त्यांचं पुस्तकांचं काम जोरात असलं, की ते असोचे अंक बाजूला ठेवीत. त्यामुळे असोचा अंक निघायला वेळ लागला की अशोक बेचैन व्हायचा. अशोकचे मित्र रघू दंडवते, वृंदावन दंडवते, माधव वाटवे असे बरेच जण असोच्या छपाईचा खर्च करायचे. असं करता करता असोचा बारावा अंक निघायला तब्बल दोन वर्षे लागली. बारावा अंक निघाल्यावर जयवंत दळवींनी त्यावर ललितच्या ठणठणपाळ सदरात एक स्फुट पण लिहिलं. या बारा अंकांमधून मधू मुंगेसकर, माधव वाटवे, रवींद्र कपूर, मधू साबणे, भालचंद्र नेमाडे, बाळकृष्ण आराध्ये, मनमोहनांचं स्वत:चं निवेदन असा भरगच्च मजकूर होता. अशोकनंच स्वत: या बारा अंकांचं संपादन केलेलं होतं. मग असोचा तेरावा अंक निघायला तब्बल आठ महिने लागले. कारण अरुण कोलटकरच्या इस इंडिया में रख्खा ही क्या हैया कवितेमुळे संगम प्रेसवर पोलिसांचा ससेमिरा लागला. माधवराव पटवर्धनांनी मग अंक छापायचं नाकारलं.
याच सुमारास कोसलाप्रसिद्ध  झाली नि भालचंद्र नेमाडे एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला. मराठीमधला ग्रेट्व्लेखक नि कदंबरीकार झाला. आजतागायत त्याचा मराठीतला ग्रेटनेस कमी झालेला नाही. १९६० नंतरचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार कोण तर भालचंद्र नेमाडे. सर्वश्रेष्ठ लेखक कोण तर नेमाडे. रा. . देशमुख प्रकाशनातर्फे ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यावेळी कादंबरी झपाट्यानं लिहून व्हावी म्हणून देशमुखांच्या पत्नी सुलोचनाबाई यांनी नेमाडे याला आपल्या घरी अक्षरश: स्थानबद्ध करून ठेवलं होतं. अशोक आणि नेमाडे तीन आठवडे देशमुखांच्या घरीच राहत होते. नेमाडे दिवसभर लिहायचा. अशोक लिहून झालेलं प्रत्येक पान वाचून कुठं दोष आढळला तर सूचना करायचा. मग नेमाडे ते पान परत लिहून काढायचा. दिवसभरात लिहून झालेली सगळी पानं मग लक्ष्मी रोडवर असलेल्या साबय्या भंडारीकडे ते नेऊन द्यायचे. भंडारीची कंपोझिंग रूम होती. साबय्या पण जिद्दीनं मिळालेली पानं दुसर्‍या दिवशीपर्यंत कंपोज करून ठेवायचे. अशा तर्‍हेने ही वीस फॉर्मची कोसलानेमाडेनं तीम आठवड्यात झपाटल्यासारखी लिहून काढली. भंडारींनी पन तेवढ्याच दिवसांत ती कंपोजदेखील केली. मग प्रिंटिंग, बायंडिंग होऊन आणखी पंधरा दिवसांनी कादंबरी बाजारात आली. नेमाडेच्या बरोबर अशोक नसता तर कोसलाइतकी चांगली झाली असती का? अशोकचा निदान एक टक्का तरी कोसलागाजण्यात सहभाग आहेच की! पण याचं श्रेय अशोकला आजतागायत कोणाही समीक्षकानं दिलेलं नाही, याची अशोकला खंत आहे. आणखी एका गृहस्थांना कोसलाआपल्या मौज प्रकाशनाला का मिळाली नाही याची खंत आहे. अगदी कोसलाप्रसिद्ध होईपर्यंत आपल्याला शहाणे यांनी तिचा थांगपत्ताही लागू दिला नाही, याची श्री. पु. भागवतांना मोठी खंत आहे. तसं जाहीरपणे त्यांनी मॅजेस्टिक गप्पांमध्ये त्यांच्या मुलाखतीत सांगून टाकलं. मग सगळ्या वर्तमानपत्रांमधून, साप्ताहिकांतून, वाङ्मयीन मासिकांतून कोसलावर भरपूर लिहिलं गेलं. या सर्व समीक्षालेखांचं पुढे कोसलाबद्दलया नावानं संकलनही करण्यात आलं. अर्थातच मराठीच्या प्राध्यापकांच्या सोय़ीसाठी. या सर्व समीक्षकांनी कोसलाग्रेटच ठरवली होती. फक्त प्रा. नरहर कुरुंदकर यांनी विरोधी सूर लावला होता की, ‘कोसलाही कादंबरीच नाही. या कादंबरीमुळे कादंबरी क्षेत्रात नेमाडे पंथ निर्माण झाला नि कोसलाचं भ्रष्ट अनुकरण काही तरुण लेखकांनी केलंच! गेल्याच वर्षी तरुण भारत’ (बेळगाव)च्या दिवाळी अंकात नेमाडे पंथाचा लेखा-जोखाम्हणून तीन लेख प्रसिद्ध झाले आहेत.
. . . तर अशोक एक दिवस मला म्हणाला, “मध्या, ‘कोसलाचं जाऊ देत पण भाऊ पाध्येचा वासूनाकाप्रसिद्ध होऊ देत, म्हणजे बघ मराठी साहित्यात कशी धमाल उडते ते!” ‘वासूनाकाखरंतर कोसलाच्या आधी प्रसिद्ध व्हायला हवा होता. पण या कथासंग्रहातील तीन-चार कथा प्रकाशकामुळे गहाळ झाल्या. त्या भाऊ पाध्यानं मग पुन्हा लिहून काढल्या. त्यामुळे दोन वर्षांनी उशिरा वासूनाकाप्रसिद्ध झाला. आणि मग अशोक म्हणाला त्याप्रमाणे धमाल उडाली. हा कथासंग्रह अश्लील आहे, अशी सर्वत्र बोंब झाली. मग आचार्य अत्र्यांनी त्यावर मराठामध्ये अग्रलेख लिहून तो कथासंग्रह अश्लील आहे म्हणून भाऊची खूप हजेरी घेतली. काही उद्योगी लोकांनी मग सरकारला या पुस्तकावर खटला भरावा असंही सुचवलं. सरकारनं ग. दि. माडगूळकर यांची एक सदस्य समिती नेमली आणि सरकारला अहवाल सादर करावा असं सुचवलं. त्यानंतर भाऊ एक दिवस पुण्यात आला. अशोक आणि भाऊ पाध्ये जिमखान्यावर लकीत चहा पीत बसले असताना अशोक म्हणाला, “समोरच पटकथा लिहिण्यासाठी माडगूळकर पूनम लॉजमध्ये येऊन राहिले आहेत. तर त्यांना भेटायचं का?” भाऊ म्हणाला, “नको.” मग अशोक अगदी कॉन्फीडंटली म्हणाला,“अरे, काही होणार नाही. माडगूळकरच स्वत: द्वैअर्थी शब्द वापरून सिनमाची गाणी लिहितात म्हणजे की, ‘चिंचा आल्याती पाडाला, हात लावू नका माझ्या झाडाला’.” (सिनेमाचं नाव- जशास तसे). मग पुढे तो अहवाल आलाच नाही आणि भाऊ पाध्ये खटल्याच्या भनगडीतून सुटला.
आता दुसर्‍या वर्षीचे असोचे सहा अंक काढायचं ठरलं आणि वार्षिक वर्गणी पाच रुपये ठेवायची असं अशोकनं ठरवलं. तो परत मुंबईला गेला आणि त्यानं कृष्णा करवार यांच्या मेव्हण्यांच्या प्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांचं नाव मोहनशेठ. त्यांचा मोहन मुद्रणालय नावाचा इंग्रजी प्रेस होता. ते मुख्यत: इंग्रजी पुस्तकं छापायचे. मराठी टाईप त्यांच्याकडे अगदी थोडा होता. अशोक पुण्यात असताना साबय्या भंडारींच्या कंपोजरूममध्ये खिळेजुळणी शिकला. छापायसाठी फ्रेम कशी लावायची हेही शिकला. या सगळ्याचा फायदा अशोकला मोहन मुद्रणालयात काम करताना झाला आणि त्यानं छपाई व्यवसायात खूप प्रावीण्य मिळवलं. इतकं की पुढे प्रास प्रकाशनसुरू केल्यावर प्रत्येक पुस्तकाची मांडणी करताना त्याला खूप सोपं गेलं. त्यामुळे प्रत्येक पुस्तकाचा आकार आणि मांडणी यात वैविध्य आणता आलं. वाद्यमहर्षी अल्लाऊद्दीन खान यांचं बंगालीतून अनुवाद केलेलं चरित्र छापताना कल्पना प्रेसचे लाटकर हतबल झाले. त्यांना त्या पुस्तकाच्या आकाराची फ्रेमच अ‍ॅडजेस्ट करता येईना. अशोक मग स्वत: पुण्याला आला. लाटकरांच्या थोरल्या भावाचा भोसरी इथं प्रेस होता, तिथं सतत महिनाभर जाऊन स्वत: उभं राहून अशोकनं ते देखणं पुस्तक छापून घेतले. पुढे प्रास प्रकाशनाच्या घर-दारया पुस्तकाला उत्कृष्ट छपाई नि मांडणीबद्दल अशोकला राष्ट्रपती पुरस्कार आणि ताम्रपटही मिळाला.
नंतर असोचे १३ ते १८ अंक मोहन मुद्रणालयात अशोकनं छापून घेतले. त्यातल्या तेराव्या अंकात रघू दंडवतेचा खर्डाहा अप्रतिम गद्याचा नमुना असलेला मजकूर प्रसिद्ध झाला. त्यावरूनच पुढे रघूनं वसेचि नाही कादंबरी लिहिली. ती प्रास प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. मग चौदावा अंक लगेच निघाला. सहासष्टच्या नाताळात अशोक पुण्यात आला होता. त्याच वेळी कॉलेजला सुटी होती म्हणून नेमाडेही पुण्यात आला होता. मनोहर ओक देखील अशोकबरोबर मुंबईहून आला होता. अशोकच्या घरी आम्ही चौघं म्हणजे मी, नेमाडे, अशोक नि मनोहर ओक जमलो असताना अशोक म्हणाला,“‘असोच्या पंधराव्या अंकासाठी चित्र पाहिजे आहे. तर आपण मनमोहनांच्याकडे पाहू या.” म्हणून आम्ही सगळे मनमोहनांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हांला स्वत:ची बरीच चित्रं दाखवली. त्यातलं हत्तीचं एक सुरेख चित्र अशोक नि नेमाडे यांना आवडलं. म्हणून्ते त्यांनी असोच्या पंधराव्या अंकासाठी निवडलं. पुढे पंधरावा अंक निघाला तेव्हा ते मुखपृष्ठावरलं मनमोहनांचं चित्र खूप लोकांना आवडलं. त्या पंधराव्या अंकात माझं चार ते सोळाया नावाचं आत्मनिवेदन होतं. त्या मजकुरावर आधारित अशी घर-दारही कादंबरी लिहिली. ती पुढे अशोकनंच प्रास प्रकाशनातर्फे प्रकाशित केली. सोळावा नि सतरावा असोचा अंक निर्वेधपणे निघाला. अठरावा अंक अजून निघायचा होता.
अशोक एक दिवस मनोहर ओकबरोबर राजेंद्रसिंह बेदी यांच्याकडे गेला. त्या दोघांनी असोसाठी एखादी उर्दू कथा द्यावी अस आग्रह धरला. बेदीजी तत्काळ होम्हणाले. पण कथा द्यायच्या आधी ते म्हणाले,“आम्ही काही चांगलं लिहिलं तर ते छापूनच येत नाही. ती कथा छापून येण्याआधीच ते मासिक बंद पडतं. तर तुम्हांला तुमचं मासिक बंद करायचं असेल तर घेऊन जा कथा!” अशोकनं ती कथा घेतली. ती उर्दू लिपीत असल्यानं देवनागरीत करून घेणं आवश्यकच होतं. म्हणून अशोक पैठणला मोठ्या भावाकडे गेला. तिथं भावाचा एक मुसलमान मित्र होता. त्याच्याकडून ती अशोकनं देवनागरीत करून घेतली. नि तो परत पुण्यात आला. पण काहीबाही कारणं निघून अशोक मुंबईला जाऊच शकला नाही. आणि बेदींचं म्हणणं खरं ठरलं. ‘असोचा तो अठरावा अंक कधीच निघाला नाही. ‘असोकायमचं बंद पडलं.
त्यानंतर दोन वर्षांनी नेमाडेनं औरंगाबादहून वाचासुरू केलं. त्यात बहुतेक असोत लिहिणारे लेखकच लिहीत होते. ‘वाचाचे सहा अंक निघाले. वर्गणी पाच रुपये होती. त्यातल्या शेवटच्या अंकात गाजलेला लेख हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ प्रसिद्ध झाला नि पुन्हा एकदा मराठी साहित्यात हलचल झाली. त्यात नेमाडेनं त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांवर झोड उठवली होती. त्यामुळे ते सगळे फारच अस्वस्थ झाले. आता तर नेमाडेच स्वत: लेखकराव झाला आहे. त्याचं काय करायचं!
असोआणी वाचानंतर अनियतकालिकं निघाली, त्यात भारूड’ (तारा रेड्डी, अरुण खोपकर), ‘तापसी’ (सतीश काळसेकर), ‘येरू’ (राजा ढाले), ‘विद्रोही’ (नामदेव ढसाळ). चंद्रकांत खोत यांनी तर एक अबकडइचा अंक संपूर्ण अनियतकालिकांच्या सूचीसाठी काढला. अनियतकालिकांच्या चळवळीतील लोकांच्या मुलाखतींवर आधारित असाही एक अंक काढला. तो खूप गाजला. ‘सत्यकथेशी संबंधित असलेल्या वसंत आबाजी डहाके यांनी त्रिशंकूनावाचा अंक काढला. पुढे अनियतकालिकांच्या चळवळीचे आत्मतत्त्व हरवून बसलेल्या नि संपादकीय भूमिका नसलेल्या आणखीन बर्‍याच लघुपत्रिका निघाल्या. त्या काही अंक काढून बंद पडल्या.
अशा तर्‍हेने अशोकनं सुरू केलेल्या या अनियतकालिकांच्या चळवळीचा अंत झाला. या चळवळीचं फलित काय? ‘सत्यकथासंस्कृतीमधील नवकथा, नवकाव्य, त्यातील दुर्बोधता, कलात्मकतेच्या आहारी जाऊन आणलेला संज्ञाप्रवाह’, धपापत्या उराच्या लेखिका, या सर्व गोष्टींची छुट्टी झाली. आणि दलित साहित्याची एक हिरवीगार फांदी मराठी वाङ्मयाला फुटली. राजा ढाले, नामदेव ढसाळ यांसारखी दर्जेदार ललित लेखक उदयास आले. नामदेव ढसाळ तर म्हणतो की, ‘मी अनियतकालिकांच्या चळवळीतला कवी आहे, मी कवी झालो नसतो तर आज दाऊद इब्राहिमच्या टोळीत दाखल झालो असतो.’ या सगळ्या गोष्टींचं सर्वात मोठं असं श्रेय अशोकलाच आहे, यात तिळमात्र शंका नाही.
. . . आता रघू दंडवतेनं कांदिवलीला स्वत:चा वनरूम किचन ब्लॉक घेतला होता. त्यामुळे अशोकची मुंबईत राहायची कायमची सोय झाली. तोपर्यंत अशोक भटक्या नि विमुक्त जमातीतलाच होता. आज इथं तर उद्या तिथं! अशोक आणि रघू दोघेही खादीचे कपडे वापरायचे. त्यांच्या घरात सगळी भांडी खापराची होती. दूध खापराच्या भांड्यात तापवायचं, दही खापराच्या भांड्यातच लावायचं, खापराच्या भांड्यातच कालवण शिजवायचं आणि जोडीला पाण्याचा माठ पण खापराचाच! त्या दोघांनाही चांगला स्वयंपाक येतो. अशोक तर तीन घडीच्या पोळ्या इतक्या सुंदर करतो की, एखाद्या गृहिणीनं लाजावं. रघू कालवण करून अशोकच्या हातच्या मऊ-मऊ तीन घडीच्या पोळ्या घेऊन सकाळी आठलाच ऑफिसला निघून जायचा. मग अशोक जेवून अकरा वाजता एशियाटिक ग्रंथालयात जायचा, ते थेट संध्याकाळी सातलाच परत यायचा. ग्रंथालयात दुर्गा भागवत पण असायच्या. मग त्यांच्याबरोबर खूप चर्चा वगैरे व्हायच्या. दुर्गाताई अशोकच्या हुशारीवर फारच खूश असायच्या. मग एक दिवस दुर्गाताई अशोकला म्हणाल्या, "मी तुझा डबा आणत जाईन. तू उद्यापासून घरून जेवून येऊ नकोस." तर मग दुसर्‍या दिवसापासून अशोक नि दुर्गाताई दुपारच्या वेळेला एकत्र जेवू लागले. याचा तिथं येणार्‍या साहित्यिकांना फार हेवा वाटायचा. पण एक दिवस दुर्गाताई नि अशोक यांची खूप साहित्यिक वादावादी झाली. तर अशोक ग्रंथालयातून निघून गेला. जेवणाच्या वेळेला अशोकची त्यांना आठवण झाली. त्या इतरांना म्हणाल्या, "जा रे अशोक रागावून गेलाय. त्याला कोणीतरी शोधून आणा रे!" पण अशोक कुणालाच सापडला नाही. मग त्या दिवशी दुर्गाताईंनी पण डबा खाल्ला नाही.
एक दिवस मॅजेस्टिकचे कोठावळे शेठ अशोकला म्हणाले, "शहाणे, तुम्ही आमचे साहित्य सल्लागार म्हणून याल का?" तर अशोक म्हणाला, "येतो". नि दुसर्‍या मॅजेस्टिकच्या कार्यालयात जायला लागला. आठवड्याभरातच मॅजेस्टिकवर लेखकांची सकाळपासून वर्दळ सुरू झाली. पण ते आले की थेट अशोकला जाऊन भेटायचे. गप्पा मारून परस्पर निघून जायचे. . . केशवराव कोठावळ्यांना कुणीच भेटायचं नाही. याचं कोठावळे शेठना फार वैषम्य वाटे. तर एक दिवस ते अशोकला म्हणाले, "शहाणे, तुमच्याकडे येणार्‍या लोकांची वर्दळ कमी झाली पाहिजे. त्यांना सांगा कामाशिवाय यायचं नाही." यावर अशोक म्हणाला,"मी इथं असेपर्यंत हे सारे लोक इथं येणारच! तर मीच स्वतः हे तुमचं काम सोडतो."
त्यानंतर अशोक परत कधी मॅजेस्टिकवर गेलाच नाही. असं मिळालेलं काम तो सारखं सोडायचा. मग एकदा मी त्याला म्हणालो, "तू सारख्या नोकर्‍या का सोडतोस?"
यावर तो मला म्हणाला,"नोकरी करणं म्हणजे साहेबाकडून मारून घेणं. ती प्रत्येकानं किती आणि किती वेळ मारून घ्यायची हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं." यावर मी निरुत्तर झालो. असंच एकदा दि. के. बेडेकर यांनी बुद्धाच्या अडीच हजाराव्या जयंतीनिमित्त अशोककडून वाईच्या नवभारतसाठी लेख मागितला. तर अशोकनं वेळेवर लेख लिहून वाईला बेडेकरांकडे पाठवला. तो विशेष अंक निघाला. पण वेळेवर पाठवूनही अशोकचा लेख त्यात छापलाच नव्हता. अशोक भयंकर चिडला. त्यानं लगेच बेडेकरांना लेख वेळेवर पाठवूनही का छापला नाहीत म्हणून खरमरीत पत्र लिहिलं. अशोक कोण किती मोठा आहे याची कधी भीडभाड ठेवत नाही. तो स्पष्ट्पणे बोलून किंवा लिहून मोकळा होतो. म्हणूनच पुढे त्याने एका गांडूचे गार्‍हाणेनावाची षंढ पिढीची अगतिकता व्यक्त करणारी कविता लिहिली.
अनियतकालिकांची चळवळ बंद पडल्यावर अशोकनं ठरवलं की, अशी मासिकं वगैरे काडून काहीही उपयोग होत नाही. तर आपण आता स्वतः प्रकाशन काढून स्वतःच पुस्तकं प्रसिद्ध करायची. १९७६च्या शिमग्याला अशोकनं अरुण कोलटकरचं अरुण कोलटकरची कविताया नावाचं पुस्तक काढून प्रास प्रकाशन सुरू केलं. ही पुस्तकं पुण्यात लाटकर यांच्या कल्पनाप्रेसमध्ये छापायची असं त्यानं ठरवलं. नंतर लगेच मनोहर ओक याची अंतर्वेधीही कादंबरी प्रकाशित केली. त्या कादंबरीत इंट्यूशन असणार्‍या माणसाची गोष्ट होती. आता पुस्तक वितरणाची काही सोय करायलाच हवी होती. तर सर्वांत प्रथम अशोकनं कोठावळे शेठनाच विचारलं. तर ते म्हणाले, "आम्ही एका वेळेला दोनशे प्रती घेऊ." मागला सगळा राग कोठावळे शेठ मोठ्या मनानं विसरले होते. मग पुण्यात आणखी डेक्कनवर इंटरनॅशनल बुक डेपो. पॉप्युलर लायब्ररी. फर्ग्युसन रोडवरील अभिनव पुस्तक मंदीर, उत्कर्ष अशा दुकानांतून पुस्तक विक्रीला ठेवायचं ठरवलं.
पुस्तकं ऑन सेलकुणाकडेच ठेवायची नाहीत. ते जेवढी पुस्तकं घेतील तेवढ्याचं बील कमिशन वजा जाता दिलंच पाहिजे असं पक्कं झालं. मुंबईत बाँम्बे बुक डेपोत नि नेरुरकर शेठच्या दादरच्या दुकानात पुस्तकं विक्रीसाठी द्यायची असं ठरलं. पुण्यातली विक्री व्यवस्था अशोकनं माझ्यावर सोपवली आणि लाटकरांच्या प्रेसमधून काही प्रती माझ्या घरी पोचत्या व्हायला लागल्या. नि मी चलनं तयार करून पुण्यातल्या दुकानदारांकडे त्या प्रती पोचत्या करायला लागलो. २५ टक्क्यांपेक्षा जास्त कमिशन कोणालाही द्यायचं नाही असं अशोकचं धोरण होतं. अशोक पुण्याला आला की बिलं वसुली करायचा. मनोहर ओकला कायमच कडकी असायची तर त्याला पैशाची खूप गरज आहे हे समजून अशोकनं मॅजेस्टिकवाल्यांना ६५ टक्के कमिशन देऊन सर्व हजार प्रती देऊन टाकल्या नि रोख पैसे घेऊन ते सगळे पैसे मनोहर ओकला देऊन टाकले.
७८-७९च्या सुमारास जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात आलं नि अनु वर्दे शिक्षण मंत्री झाले. त्याच वर्षी नेहमीच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र टाइस्मने मोठ्या साहित्यिकांकडून आपण या वर्षात वाचलेल्या पुस्तकांपैकी तुम्हाला सर्वांत आवडलेल्या पुस्तकाबद्दल लिहा असं सांगितलं. तर पु. ल. देशपाडे यांनी लेटर टू अ टीचरया इटलीतील एका खेड्यातल्या मुलांनी आपल्या बाईंना लिहिलेल्या तुम्ही आम्हाला कसं शिकवावंया पुस्तकाबद्दल लिहिलं होतं. अशोकला ते पुस्तक मिळवून छापावं असं वाटलं. तो त्या पुस्तकाचा शोध घ्यायला लागला तर त्याला कळलं हे पुस्तक बाजारात मिळत नाही. मग काही दिवसांनी पु.लं.कडून कळलं की ते पुस्तक कुमुदबेन मेहता यांच्याकडे आहे. अशोक त्यांना जाऊन भेटला. त्या म्हणाल्या, "माझ्याजवळ ही एकच प्रत आहे. तर जपून वापर नि मला परत कर." अशोकनं मग त्या इटलीतील बार्बियाना या खेड्यातील मुलांचा पत्ता काढला. त्यांना पत्र लिहून मराठीत अनुवाद करण्यासाठी परवानगी मागितली. त्याचा मानधनाचा आकडाही कळवा असं लिहिलं. तर पोरांनी आम्हाला महात्मा गांधींचं समग्र वाङ्मय पाठवा’, असं उत्तर दिलं. अशोक एकदम खूश झला. त्यानं ती पुस्तकं त्यांना पाठवून दिली. मग भाषांतर कुणी करायचं? तर सुधा कुलकर्णी यांनी जबाबदारी स्वीकारली. आता प्रती किती काढायच्या, तर तीन हजार प्रती काढाव्यात असं त्यानं ठरवलं. ग्रंथालीवाल्यांनाही ते पुस्तक काढायचं होतंच. पण अशोकला त्याची परवानगी मिळाल्यमुळे त्यांचा नाइलाज झाला. मग त्यांनी अशोकबरोबर असा करार केला की, पुस्तकाच्या तीन हजार प्रती आम्ही घेणार नि निम्मा खर्च पण देणार. प्रास आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त प्रकाशनाखाली हे पुस्तक काढावं. अशोक म्हणाला, "ठीक आहे. तर एकूण सहा हजार प्रती काढू या." मग अशोक अनु वर्दे यांना जाऊन भेटला आणि त्यांना म्हणाला, "हे पुस्तक शिक्षणविषयक महत्त्वाचं आहे तर शिक्षण मंत्रालयानं बालभारतीकडून स्वस्तातला कागद द्यावा. म्हणजे पुस्तकाची किंमत खूप कमी ठेवता येईल आणि खेड्यापाड्यार्यंत ते पोचेल." वर्दे यांनी सरकारी कागद दिला. त्यामुळे पुस्तकाची किंमत फक्त सहा रुपये ठेवण्यात आली आणि व्यक्तीला फक्त पाच रुपयात द्यायचं असं ठरलं. दुकानदारांना मात्र शंभरपेक्षा अधिक प्रती घेतल्यास ३३ टक्के कमिशन द्यावं असं अशोकनं ठरवलं. पण पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी तीन हजार प्रती उचलण्याऐवजी फक्त एक हजार प्रतीच उचलल्या. तर अशोकनं त्यांना ३३ टक्के कमिशननेच दिल्या. त्यांनी आपला शब्द पाळला नाही. आता या पाच हजार प्रतींचं काय करायचं? नि झालेला खर्च कसा भरून निघणाअर? अशोक खूप अडचणीत आला. तर रघू म्हणाला, "पुस्तक खूप चांगलं आहे. नि आपण लोकांना फक्त पाच रुपयांत तर देणार आहोत. पुस्तक दोन-तीन वर्षांत खपेल, काळजी करू नकोस." त्या पुस्तकाचं नाव प्रिय बाईअसं होतं. मुखपृष्ठावर वरती प्रिय बाई’. त्याखाली मध्यभागी पु.लं.च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेल्या त्या लेखातील एक ओळ छापली होती. त्या ओळीखाली पु.लं.ची लपेटदार सही पु. ल. देशपांडेआणि अगदी शेवटी मोठ्या अक्षरात बार्बियानाची शाळा असं छापलं होतं. पुस्तकं अपेक्षेपेक्षा खूपच लवकर खपली. कदाचित हा पु.लं.च्या लपेटदार सहीचा परिणाम असावा.
त्यानंतर अशोकनं प्रासतर्फे दहा बाय दहा (चित्रे), साक्षात (सतीश काळसेकर), समुद्र (वसंत गुर्जर), खेळ (नामदेव ढसाळ), मेलडी (भालचंद्र नेमाडे) असे महत्त्वाचे कवितासंग्रह काढले. दिलीप चित्रेचं चाव्याहे पुस्तक व घर-दार (मधू साबणे), वसेचि ना (रघू दंडवते) अशा कादंबर्‍या काढल्या. फोटो आणि दृष्टचक्रअशा दोन एकांकिका (वृंदावन दंडवते) ही पुस्तकं लागोपाठ काढली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अरुण कोलटकरच्या जेजुरीया इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढली. सलमान रश्दी या प्रख्यात कादंबरीकाराला आवडलेलं हे पुस्तक आहे. त्यानंतर मधल्या काळात प्रास प्रकाशनठप्पच झालं होतं. ते परत २००१ साली पुन्हा सुरू झालं. या पाच वर्षांत अरुण कोलटकर मृत्यूच्या छायेत असताना त्याची चिरीमिरी (याची तीन महिन्यांत दुसरी आवृत्ती निघाली), ‘द्रोणआणि सर्वांत शेवटी भिजकी वहीअसे तीन कवितासंग्रह लागोपाठ दोन वर्षांत काढले. अरुण गेल्यावर पोलीसमनहे त्याच्या रेखाचित्रांचं पुस्तकही काढलं. पण अरुण गेल्यावर त्याला साहित्य अकादमीपुरस्कार देण्यात आला, याचं अशोकला खूप वाईट वाटतं. शिवाय रघू दंडवते यांचा वाढवेळआणि रेखा आठल्ये यांचा अवशेषअसे आणखीन दोन संग्रहही काढले.
. . . एक दिवस पुण्याच्या कलोपासकया नाट्यसंस्थेचे सेक्रेटरी राजा नातू अशोककडे आले. तर अशोक समोर धरून एक पुस्तक वाचत होता. त्यानं नातूंना बसायला सांगितलं. नि लगेच म्हणाला,"राजा हे मस्त पुस्तक तुला थोडंसं वाचून दाखवतो." राजाभाऊ म्हणाले, "वाच." अशोकनं भरभर दहा-वीस पानं त्यांना वाचून दाखवली. ते पुस्तक खरंच ग्रेट होतं. राजाभाऊ तल्लीन होऊन ऐकत होते. थोड्या वेळानं अशोकनं वाचन थांबवून पुस्तक खाली ठेवलं. मग राजाभाऊंनी कुतूहल म्हणून पुस्तक चाळलं. तर ते चक्क बंगाली भाषेत छापलेलं होतं आणि अशोक त्यांना ते चक्क मराठीत वाचून दाखवत होता. राजाभाऊ चक्रावले. अशोकनं इतकं मोठ्ठं बंगालीवर प्रभुत्व मिळवलं आहे. तो इंतरसायन्स झाल्यावर कॉलेज सोडून देहूरोड डेपोत नोकरी करत होता. जवळजवळ दोन वर्षं अशोक त्या ऑफिसात होता. तिथं एक बंगाली साहेब होता. त्याच्या मदतीनं अशोक प्रथम बंगाली शिकला. मग त्यानं बंगाली मासिक, पुस्तकं वाचायचा सपाटाच लावला आणि सरळ ओळखदेख नसताना बंगाली लेखकांशी पत्रव्यवहार सुरू केला आणि त्याला खूप बंगाली लेखक मित्र म्हणून मिळाले. त्यात गौरकिशोर घोष, ‘आनंद बझार पत्रिकेचा सहसंपादक याच्याशी खूप गट्टी जमली. मग अशोक अशोक दरवर्षी जानेवारीत कोलकत्याला जायचा नि गौरकिशोरकडेच उतरायचा. आणीबाणीत गौरला अटक करून स्थानबद्ध करण्यात आलं. तेव्हा अशोक गौरकिशोरच्या घरी देखभाल करण्यासाठी मुद्दामहून तीन महिने जाऊन राहिला होता. या गौरकिशोर घोषची इसम नावाची कादंबरी मराठीत अनुवाद करून प्रासतर्फे प्रकाशित केली. आणखीन सीमाबद्धजनआरण्यअशा शंकर या बंगालीतील लोकप्रिय लेखकाच्या कादंबर्‍या मराठीत अनुवादित केल्या. या दोन कादंबर्‍यांवर सत्यजित राय यांनी बंगालीत सिनेमे काढले आहेत. ते जगभर खूप गाजले. आणि नंतर नॅशनल बुक ट्रस्टसाठी अशोकनं माणिक बंडोपाध्याय यांची साइखड्यांच्या खेळाची गोष्टही कादंबरी अनुवादित केली. आता अशोकच्या लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक लोकवाङ्‍मय गृहानं नपेक्षाया नावानं बाजारात आणलंय. त्या पुस्तकाची अजून तरी कोणी जारीनं दखल घेतलेली नाही.
एवढं सगळं झालं तरी अनियतकालिकांच्या चळवळीमुळे मराठी साहित्य नोबेलपुरस्काराच्या दिशेनं तसूभरही पुढे सरकलं नाही, ही खंत अशोक आणि आम्ही सगळे या चळवळीतील त्याचे मित्र यांना आहेच.
तरीपण अशोक द ग्रेटच! निदान मराठी साहित्यापुरता तरी!
***
('सत्याग्रही विचारधारा'च्या २००६च्या दिवाळी अंकातील लेख.)

मैत्र