१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Tuesday, September 21, 2010

'नपेक्षा'संबंधीच्या दोन बातम्या

('नपेक्षा'संबंधीच्या दोन बातम्या. एकाच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातम्या.
केवळ संदर्भासाठी इथे, जशाच्या तशा. )
-------------------------------------------------------------------------------------------------------------

'नपेक्षा'त साहित्य, संस्कृती, भाषा, परंपरा यांची झाडाझडती
-----------------------
औरंगाबाद, ता. १८: 'नपेक्षा' यापूर्वीच प्रकाशित व्हायला हवे होते. त्यात साहित्य, संस्कृती, भाषा, परंपरा यांची झाडाझडती घेण्यात आली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक अशोक शहाणे यांच्या लेखनावरील चर्चेने वाङ्‌मयीन उंची गाठली.


लोकवाङ्‌मय गृहातर्फे प्रकाशित जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक अशोक शहाणे यांच्या 'नपेक्षा' या लेखसंग्रहाचे प्रकाशन त्या पुस्तकावरील चर्चेने झाले. मराठवाडा साहित्य परिषद व लोकवाङ्‌मयतर्फे झालेल्या या समारंभात साहित्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार प्रा. जयदेव डोळे, रमेश इंगळे उत्रादकर यांनी या संग्रहावर भाष्य केले. दलित साहित्यिक, नेते राजा ढाले अध्यक्षस्थानी होते.

श्री. शहाणे यांच्या लेखनातील विचारांवरील प्रेमामुळे त्यांचे लेखन प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे साहित्यिक सतीश काळसेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. त्यांचे साहित्य आज ग्रंथरूपात नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभीच श्री. शहाणे यांनी आपल्या खास संवादी शैलीत या संग्रहातील लेखनामागील भूमिका सांगितली. ते म्हणाले, की 'फुटकळ', 'सटरफटर' अशी नावे या संग्रहासाठी आपण सुचविली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी 'नपेक्षा' असे बारसे केले. १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मराठी साहित्यावरील 'क्ष-किरण' या लेखाने अनेकांच्या शिव्या मिळाल्या. रोष पत्करावा लागला. साहित्यिक ना. सी. फडके यांनी 'शहाणे यांचे हात कलम करावेत', असे आवाहन केले, ती आठवणही त्यांनी नमूद केली. वादग्रस्त ठरलेल्या लेखांसाठी आपण साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची मदत घेतली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

श्री. डोळे यांनी सांगितले, की श्री. शहाणे यांच्या लेखनातून अनेक गोष्टी शिकता आल्या. वेगळा विचार सांगणारे, मात्र पारितोषिकांच्या रांगेत न उभे राहणारे मोजके लेखक होते. त्यात अशोक शहाणे यांचा समावेश होतो. 'आमच्या पिढीचा अमिताभ' अशा शब्दांत त्यांनी शहाणे यांचा गौरव केला. त्यांनी सुरू केलेल्या 'लिट्ल मॅगझिन' चळवळीचाही श्री. डोळे यांनी आढावा घेतला. त्यांनी आपल्या लेखनात मूल्ये स्वीकारली आहेत. मात्र त्याचा त्यांनी गाजावाजा केला नाही, असेही ते म्हणाले.

श्री. इंगळे यांनी सांगितले, की साहित्य, संस्कृती, भाषा व परंपरा यांची परखड झाडाझडती अशोक शहाणे यांनी घेतली आहे.

अशोक शहाणे यांच्या चळवळीतील लेखक कार्यकर्त्यांत परावर्तित झाले, असे राजा ढाले यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले. साहित्यासोबतच समाजानेही बदलायला हवे, अशी अपेक्षा ठेवून त्यांनी लेखन केले. समाजात आजही छुपा जातीयवाद आहे. समता खरेच प्रस्थापित झाली काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, बाबा भांड, कवी तुलसी परब, ज्येष्ठ नेते ऍड. मनोहर टाकसाळ, प्रा. दत्ता भगत, प्रा. अजित दळवी, अनुया दळवी, प्रा. रमेश दीक्षित आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षात कार्यक्रमात रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहा वाजता परिषदेच्या सभागृहात अशोक शहाणे रसिकांशी संवाद साधणार आहेत.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी भाषेचे स्वत्व गमावले, की काय
-----------------------
अशोक शहाणे यांचा प्रश्‍न
-----------------------
औरंगाबाद, ता. १९ : संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, जनाबाई, नामदेव आदींनी दोन-तीन वर्षांत लिहून ठेवलेल्या कवितांची बरोबरी सातशे वर्षांनंतरही होऊ शकली नाही. आपण मराठी भाषेतील स्वत्व गमावून बसलो की काय, अशी भीती ज्येष्ठ लेखक अशोक शहाणे यांनी रविवारी (ता. १९) येथे व्यक्त केली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'साक्षात' कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीपासून समाधीपर्यंतच्या कालखंडातील त्यांच्या रचना, प्रवास, घटना श्री. शहाणे यांनी प्रारंभी उलगडून दाखविल्या. तत्कालीन संतांच्या मराठी रचनेतील काव्याचे काही नमुनेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, की ९८५ मधील शिलालेखानंतर मराठीने हजार वर्षांत साध्य केलेली प्रगती मागे वळून पाहायला लावणारी आहे. आज मराठी समाजासमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्ञानोबा, तुकोबा यांनी कल्पिलेला, की शिवाजीराजांनी कल्पिलेला मराठी समाज मानायचा. भाषा हे संस्कृतीचे सर्वांना अभिप्रेत असे रूप आहे. ते मराठीच्या बाहेर जाऊन पाहिले तरच कळू शकते. 'प्रास' या त्यांच्या प्रकाशनसंस्थेने पुस्तकांची निवड करताना काय निकष लावले, या प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले, की भावले, ते प्रसिद्ध केले. ज्ञानपीठ पुरस्कारांत मराठीचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. त्याची कारणे विचारणा-या प्रश्‍नाला त्यांनी मी बक्षिसांबद्दल विचार केलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले, की बक्षिसांचा विषय आला, की मतभेद असतातच.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, प्रा. रवींद्र किंबहुने, श्‍याम देशपांडे, जयदेव डोळे, प्रा. चंद्रकांत भालेराव, रमेश दीक्षित, प्रा. रुस्तुम अचलखांब आदींसह रसिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मैत्र