१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Sunday, October 31, 2010

'मर्यादित'ची अर्पणपत्रिका

शंकर ह्यांच्या 'सीमाबद्ध' या बंगाली कादंबरीचा अनुवाद शहाण्यांनी केला. 'मर्यादित' असे नाव असलेली ही अनुवादित कादंबरी १९७६मध्ये पुण्याच्या इनामदार बन्धू प्रकाशनाने प्रकाशित केली. अनुवादाला शहाण्यांनी जोडलेली अर्पणपत्रिका अशी-



अर्पणपत्रिकेबद्दल शहाण्यांनी सांगितलेली गोष्ट, त्यांच्याच शब्दांत-

अर्पणपत्रिकेतले 'भाऊ' म्हंजे वि. स. खांडेकर. त्यांनी माझ्या मताने सर्वात उत्तम बंगाली कादंबरी मराठीत आणायला सांगितले होते. ती प्रकाशित करायची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. त्यांना सांगितलेली बंगाली कादंबरी अजून तशीच राहिलेली आहे. ती मराठीत आणणे एक दिव्यच आहे.
तेव्हाही आणि आताही. म्हणून राहून गेले.
अशी प्रत्येक गोष्टीमागे भलतीच गोष्ट निघते.

- अशोक

---
या गोष्टीत ज्या 'सर्वात उत्तम बंगाली कादंबरी'चा उल्लेख झालाय, ती कमलकुमार मजुमदार यांची 'अंतर्जली जात्रा'.

Monday, October 25, 2010

एक फोटो

अरुण कोलटकरांच्या 'The Policeman' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळचा फोटो- (डावीकडून) शहाणे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सुजित पटवर्धन, अविनाश गुप्ते आणि पुस्तकाच्या प्रती.

Saturday, October 23, 2010

शहाणे नावाचा 'वेडा'!

- जयंत पवार

(शहाण्यांची पंच्याहत्तरी त्यांच्या मित्रमंडळींनी साजरी केली ७ फेब्रुवारी २०१०ला. त्यानंतर ९ फेब्रुवारीला 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेला हा मजकूर. साभार इथे.)

अशोक शहाणे सात फेब्रुवारीला पंच्याहत्तर वर्षांचे झाले, हे विधान बुचकळ्यात टाकणारं आहे. म्हणजे ते जन्मनोंदीने झालेही असतील पंच्याहत्तर वर्षांचे, पण गेली कित्येक वर्षं, जे त्यांना पाहताहेत त्यांना ते पंच्याहत्तरीचेच वाटत आले आहेत. आणि त्यांचा प्रत्येक विषयाचा व्यासंग आणि त्यावर बोलण्याचा धबाबा उत्साह तर विशी-बाविशीच्या तरुणाचा आहे. म्हणजे शहाणे एकाचवेळी किमान दोन वयांमध्ये वावरत आलेत.

परवा गोरेगावच्या नंदादीप शाळेत त्यांच्या मित्रांनी त्यांना एका जागी चार-साडेचार तास जखडून ठेवलं आणि त्यांना आवडत नसताना त्यांच्या पंच्याहत्तरीचा अनौपचारिक सोहळा साजरा केला. शहाणेंचा वाढदिवस म्हटल्यावर भालचंद्र नेमाडे, राजा ढाले, चंद्रकांत पाटील, अरुण खोपकर, रामदास भटकळ, शांता गोखले, जयंत धर्माधिकारी, सुनील दिघे असे बरेच जण आले. नाही नाही म्हणता सत्तर-ऐंशी शहाणेमित्र जमले!

अशा कार्यक्रमात उत्सवमूर्तीबद्दल भरभरून आणि भडभडून बोलायची स्पर्धा लागते, ज्याची शहाणेंना पहिल्यापासून अ‍ॅलर्जी. त्यांना वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कारप्रदान समारंभात त्यांच्याबद्दल बरंच बोललं गेलं. विशेष म्हणजे श्री. पु. भागवतही अचानक आणि खूप चांगलं बोलले. सत्काराला उत्तर देताना शहाणे म्हणाले, 'हे सगळं ऐकून मला वाटलं, मी मेलो की काय! थोडी विशेषणं मी मेल्यानंतर वापरायला राखून ठेवा.'

ह्याच पुरस्काराचं मानपत्र सुनील कर्णिकांनी लिहिलं होतं. शहाणेंना ते कसं वाटलं हे त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची कर्णिक वाट बघत होते. शहाणेंनी आधी कर्णिकांना सणसणीत शिवी घातली आणि मग म्हणाले, 'अरे तो पुरस्कार 'प्रास' प्रकाशनाला आहे, व्यक्तिगत मला नाही. हा माझा जीवनगौरव नव्हे. तो मी मेल्यानंतर करा.' त्यावर तितक्याच खडूसपणे कर्णिक म्हणाले, 'तो तर आम्ही करूच, पण तोवर आम्हीच राहिलो नाही तर पंचाईत व्हायची म्हणून तो आताच केला.'

तर असे हे शहाणे. त्यांचे मित्र तरी कसे सरळ बोलतील? एक चंद्रकांत पाटील सोडले तर सगळे चिमटे घेत, गुद्दे मारतच बोलले. पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रात बुद्धिमान लोकांनी एकत्र न राहण्याची परंपरा आहे. प्रत्येकाला वाटतं, आपण वेगळं काही तरी करावं. त्यामुळे आम्ही पुढे सगळे वेगवेगळे झालो. पण अशोक हा एकमेव माणूस आम्हा सगळ्यांशीच दुवा ठेवून होता.' शहाणे हे लिटिल मॅगझिन चळवळीचे पायोनियर. 'असो' हे लघुअनियतकालिक त्यांनी आणि नेमाड्यांनी सुरू केलं. मग 'आता' काढलं. 'असो'चे पाच अंक विकत घेतल्यावर 'आता'चा एक अंक फुकट मिळेल, अशी जाहिरात केली. 'मराठी साहित्यावर क्ष किरण' लिहून शहाण्यांनी साहित्यसृष्टीवर बॉम्बच टाकला. त्यात महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांबद्दल त्यांनी जे लिहिलंय ते वाचून अनेकांची फे फे झाली. नेमाडे म्हणाले, 'आम्ही दोघांनी पुणं सोडलं आणि लगेच पानशेतचं धरण फुटलं, हे प्रतिकात्मक अर्थानेच घ्यायला पाहिजे.' 'कोसला'मध्ये 'ते दोघे आले' असे वारंवार उल्लेख येतात, ते दोघं म्हणजे शहाणे आणि त्यांचे कपूर नावाचे एक मित्र होत, हे नेमाडेंनी सांगून टाकलं.

शहाण्यांनी आयुष्यभर जो वेडेपणा केला तो भल्याभल्यांना जमला नाही. समाजाचा तोल राखण्यासाठी प्रत्येक काळात असे वेडे शहाणे असावेच लागतात. आपल्यात एक तरी असा आहे.

Sunday, October 17, 2010

‘इसम’बद्दल पुलंनी लिहिलेलं

(गौरकिशोर घोष यांच्या ‘लोकटा’ या बंगाली कादंबरीच्या, शहाण्यांनी अनुवादित केलेल्या ‘इसम’या पुस्तकाचं परीक्षण पु. ल. देशपांड्यांनी लिहिलं होतं, त्यातला काही भाग. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये २२ जुलै १९८०ला प्रसिद्ध झालेलं हे परीक्षण दाद’ ह्या ‘मौज’ प्रकाशनाच्या पुस्तकात आहे.)

‘इसम’ आणि ‘मयत’ ह्या दोन अवस्थांखेरीज तिसरी अवस्था वाट्याला न येणार्‍या महानगरातल्या असंख्य इसमांतल्या एका इसमाची ही कथा आहे. भीषण आहे. करूण आहे. पण कारुण्य हसवण्यासाठी डोळ्यांना पाझर फोडण्याचा चुकूनही कुठे प्रयत्न नाही. मानवतेच्या प्रेमाचा गहिवर वगैरे भानगडी नाहीत. प्रभावासाठी कुठलीही चतुराई नाही. आणि मूळ बंगालीतली कादंबरी अशोक शहाण्यांनी मराठीत इतकी तंतोतंत उतरवली आहे, की प्रथम मराठीतून वाचून नंतर बंगालीतली वाचणार्‍याला गौरबाबूंनी अशोकच्या कादंबरीचे बंगालीत भाषांतर केलेय असे वाटावे. केवळ मूळ भाषा-शरीराशी परिचय, एवढ्या भांडवलावर भाषांतर करता येत नसते. मूळ लेखकाच्या भाषावस्थेशी तादात्म्य पावल्याशिवाय ही किमया साधत नसते. अशोक शहाणे भाषांतराला ‘अनुप्रास’ म्हणतात, खरे तर हे सहस्पंदन आहे.
. . . गौरकिशोर घोषांची ही साहित्यकृती मराठीत आणून बंगालीतल्या एका निराळ्याच ताकदीच्या लेखकाशी गाठ घालून दिल्याबद्दल ह्या कादंबरीचा वाचक अशोक शहाणेंना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. ‘अपवाद फक्त कथा-कादंबर्‍या केवळ टाइमपास म्हणून वाचणार्‍या वाचकांचा’ असे म्हणणार होतो. पण नाही अशा वाचकालाही आपल्या ‘इसम’पणाची जाणीव करून देणारी अशी ही मनाला डसणारी कादंबरी आहे.

Friday, October 15, 2010

अफलातून अशोक

- कमल देसाई
अशोक शहाणे केव्हा आणि कधी आला माझ्या आयुष्यात, हे आता आठवतसुद्धा नाही; इतका तो सहजपणे माझ्या आयुष्यात मिसळून गेलाय. रेखानं सांगितलं होतं, पत्र टाका हं, आम्ही वाट पहातो आहोत.अजून टाकतेच आहे मी पत्र. आत तस्लिमा घट्ट डोक्यात बसली आहे. आणि मराठी लेखकांचे वाभाडे काढत काढत आणखी काय काय लिहिणार आहे तो याचे मलाही कुतूहल आहे.
पण तो इथे तिथे, अवती भवती असणं आणि त्याचं बोलणं चालू असणं ही एक मजाच असते त्याच्या एकेक अफलातून आणि भन्नाट कल्पना म्हणजे विचारांचे नवे नवे धुमारे असतात. कशातही त्याला तिरपागडं दिसतंच आणि तो मग आपल्या खास अशोकी शैलीत खाड्दिशी मांडणार आपल्याला त्याचे विचार पटले नाहीत असं म्हटलं तर तो रागावतो किंवा समर्थन करतो, असं नाही परंतु मला नेहमीच त्याच्या या कशातही तिरपागडं दिसण्याचंआणि ते थेट अगदी थेट मांडण्याचं आकर्षण वाटत आलं आहे. छान, थेट मराठी कसं लिहावं हे तो खूप वेळा सहजपणे सांगून जातो. त्याचं असांकेतिक जगणं-असणं, जिथल्या तिथं अत्यंत कर्मठपणानं काही मूल्य सांभाळणं, आणि सदैव ताजेपणानं प्रत्यक्षाला भिडणं हे सर्वच जरा कठीण. मला खूप जण विचारायचे, तुम्हाला अशोकची आणि त्याच्या सभोवतालच्या मित्रमंडळींची भाषा समजते कशी?’ खरंच समजते का? तो त्याचा रोज एक नवा मित्र आणायचा. अतिगंभीरपणे त्याला ऊर्दू शिक म्हणायचा. कुणाला तरी गज्जलांच्या क्लासला जायला लावायचा आणि कोण चांगलं शिकवतं हे पण सांगून द्यायचा. ती बिचारी मुलं खरंच फार भक्तीनं ते करत. स्वतःही ऊर्दू बोलत, बंगाली बोलत, गजला म्हणत. सर्वांना गार गार करायचा. त्याच्या मंडळींची एक खास ढब असायची बोलण्याची. पुण्यात काय आणि मुंबईत काय, त्याने इतक्या हॉटेलांतून इतके नवे नवे काही खायला घातले की, मी ते सर्व विसरलेसुद्धा. पण कॉफी हौसची कोल्ड कॉफी वुइथ थिक क्रीममात्र कधी विसरले नाही.
या सगळ्यांबरोबरचा अशोक आणि मला भेटलेला अशोक एकच नसावा. तशी नसत असावी माणसं. ती वेगळी वेगळी होतात, असतात. त्याने मला झाडून सारी शंभू मित्राची बंगाली नाटकं दाखवली आणि सिनेमे तर इतके! ‘चारूलता त्याला फार आवडतो. मला नाही. गुरुदत्त डायरेक्टर म्हणून चांगला असेल, पण त्याला अभिनय नसावा असं मला वाटायचं. मला खूप मीनकुमारी किंवा वहिदा नाही आवडायची जशी की शबाना आवडते, नसिरुद्दीन आवडतो. ओम पुरी तर खूपच. पण एवढं असूनही तो असला की इतकी गंमत येते कशी? श्याम मनोहर नेहमी म्हणतो, एवढी काही मजा नाही, नाही?’ असं त्यानं म्हटलं की मला अशोक हमखास दिसतो. आणि तो म्हणजेच एक मजा असते असं वाटून जातं.
मी तेव्हा पुण्यात होते. कर्वे रोडवर जरा आत, एक गच्ची असलेलं छानसं घर मला मिळालं होतं. पण तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होते. घुसमटही चाले माझी. अशोकला न सांगताच कळायचं, काहीही चौकशी न करता, प्रश्न न विचारता तो रोज रोज संध्याकाळी यायचा. मी म्हटलं, किती छान आहे ना गच्ची नि असं एकटंच संध्याकाळचं खूप बरं वाटतं नाही?’
म. . मग एवढी पा-पायपीट करून मी तु. . . तुझ्याकडे आ.. आलो ते क-कशा करता?’ आणि हसला. मला एकदम गुहेतून- खोल खोल गुहेतून वर वर येऊन मोकळं वाटू लागलं. आपण सुट्या होऊन आकाशभर पसरतो आहोत, असं झालं आणि मी मलाच सापडले. आम्ही दोघे मग गच्चीत तसेच पडलो. आणि मला तो आकाश वाचायला शिकवू लागला. एकदम सगळं आकाश नाही बघायचं. थोडा थोडा नेमून घ्यायचा भाग आणि तेवढाच रोज रोज वाचायचा. मग कळतं. सर्व आकाशसुद्धा.
कळतं काय डोंबल? तू एक सांगणार! मला तर सगळंच आकाश दिसतंय आणि आकाशात हरवायला पण होतंय. मी आताच हरवून गेले आकाशात. मी काही अर्जुन नाही बाबा.
भिवंडीला असताना तर नवीन काही सुचलं की एक बार ठासून, तोंडात गुळणी धरून यायचाच गडी. त्याला हे सगळं सुचायचं कसं कोण जाणे! तेव्हा टेपची सोयच नव्हती. एकदा म्हणाला, मीरा एक ग्रेटच हं. द्वापारातून उचलून एकदम खाड्दिशी कृष्णाला म्हणजे तिनं प्रत्यक्षच, आज. इथं प्रत्यक्ष केलं म्हणजे काय झालं काय! त्याची भाषा नाहीच जमत. थोड्या वेळानं दुसरं. आज गाडीत एक आंधळा म्हातारा आणि त्याची आंधळी म्हातारी होती. ती दोघं स्टेशनात शिरल्यावर आधी त्यांनी गाडीला नमस्कार केला. होय, होय, मायबाप हाय ती अपली.असं म्हणत गळ्यातला पंढरीचा फोटो सावरत डब्यालाही नमस्कार करून आत शिरली. आपलं सारं हे सगळं अफलातून हं. एकदम अफलातून. असा तो आला की कधी कधी घरात काहीसुद्धा नसायचे आणि स्वयंपाक करण्याचा मनस्वी कंटाळा. भाकरीचं पीठही शिळं फार. मी पार गोंधळले. कमळे तू ऊठ. तुझं काम नव्हे ते.आम्ही जेवायला बसलो, तर अशोक, भाकरी कडू लागते कारे, कडू झालंय रे पीठ.मी ओशाळलेली आधीच त्यानं स्वयंपाक केला म्हणून आणि त्यातूनच. . . तर तो म्हणतो कसा, पोटात गोड होतं ते सर्व. आपण दोघंही चांगले निरोगी, तगडे आहोत. चल खा तू.मी बघतच राहिले. याच्याजवळ ही सहजता आली कोठून?
१२५ वर्षांचं जुनं पंचांग शोधून त्यानं एकदाची माझी पत्रिका तयार केली. आणि काही तरी जिंकून आल्यागत आला. आल्यापासून, जर् रा चुकलं बघं. पाच मिंटं अधी जन्माला आली असतीस ना, तर राजाची राणी झाली असतीस. अगदी पाचच मिंटं आधी.मी चांगलीच वैतागले. पण सारा दिवस कानाशी भुणभूण. पत्रिका एकूण खूपच वाईट कशी आहे आणि किती आहे. मला वाटलं जगात मी एकटी एकच इतकं सर्व वाईट घेऊन जन्माला आले की काय? मी ऐकता ऐकता झोपले. तर उठवून सांगणार- ऐक तरी-‘ ‘मरू दे ना ती पत्रिका.’ ‘पण ऐक नापुन्हा सुरू. नि म्हणाला, बाकी कमळे, काही न ऐकता ऐकण्याचं सारं कौशल्य चेह-यावर ठेवता येतंय तुला, म्हणजे तू एकदम ग्रेटच असली पाहिजेस.
त्यानं केलेल्या चळवळीत मला भाग घ्यायला पत्र लिहायचा. पण लिहिणं मला फारसं आवडतच नसे. एकटं, स्वतंत्र आत्मसन्मानानं, आत्मप्रतिष्ठेनं आणि आनंदात जगणं हे जसं मला कठोरपणे करावंसं वाटलं. तसं मला लिहावसं वाटलंच नाही. लिहिणं झालं, ती देवाची कृपा, आपापतः ठरवून नाही. मी डांगेच्या कथांवर एक लेख लिहिला होता सत्यकथेत. तर म्हणाला, तुझा हा लेख. इतक्या काही वाईट नाहीत ह्या कथा. जरा बरा लिहितो तो. फार नाही. पण जरा.तसंच आता हे वाचून मला म्हणेल आपल्या जिवण्यांच्या कोप-यांना मुरड मुरड घालत, इतका काही मी वाईट नसावा. जरा बरा असेन.
मला धो धो हसू येईल.
***
'महाराष्ट्र टाइम्स'च्या १९९४च्या 'वार्षिक'मध्ये 'निर्भयस्पर्शी दुर्गाबाई नि अफलातून अशोक' हा लेख प्रसिद्ध झालेला. त्यातला दुसरा भाग हा.

Wednesday, October 13, 2010

अ‍ॅलन गिन्सबर्गच्या पुस्तकात

अ‍ॅलन गिन्सबर्गची बांगलादेशसंबंधीची एक कविता पहिल्यांदा शहाण्यांनी पोस्टर करून छापली होती.  ती कविता त्याच्या ज्या कवितासंग्रहात आहे त्यात शहाण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्येय. ते पान.

Acknowledging. . .

The fall of America: poems of these States, 1965-1971
 By Allen Ginsberg

***
अ‍ॅलन गिन्सबर्गची ही कविता होती September on Jessore Road

आणि तो बांगलादेशात गेलेला तेव्हाचा त्याचा एक फोटो

गिन्सबर्ग ते शहाणे व्हाया कोलटकर

अरुण कोलटकर अमेरिकेला गेले असताना अ‍ॅलन गिन्सबर्गला भेटले तेव्हा त्याने कोलटकर नि शहाण्यांना मिळून एक त्याच्या कवितांचं पुस्तक भेट दिलं. ते हे -

पानं उलटली की डाव्या बाजूला दिसतं त्या पानावर
गिन्सबर्गने काढलेलं हे खास त्याचं असं चित्र-

















त्याच्या शेजारचं उजवीकडचं पान हे- 

















उजवीकडच्या पानाचा वरचा भाग अजून जवळून-













त्याच पानाची खालची बाजू जवळून- 

















***
***

Monday, October 11, 2010

शहाणे

- सुनील कर्णिक

(‘आपलं महानगरमध्ये पुस्तकाबाहेरचा पुस्तकवाला या सदरात १२. ७. १९९७ या तारखेला प्रसिद्ध झालेला मजकूर.)

पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी अशोक शहाणेंची आणि माझी ओळख नव्हती. पण तेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलेली एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आहे.
त्या काळी आम्ही अधूनमधून सर्वोद्य साधना साप्ताहिकाच्या कचेरीत जायचो. तिथे काम करणारा मेघश्याम आजगावकर एकदा म्हणाला, आम्ही विनोबांच्या भूदान चळवळीच्या मदतीसाठी मुंबईत एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. तिथे एक जण आला आणि माझ्या हातात एक कापडी पिशवी देऊन जाऊ लागला. मला काहीच कळेना. मी पिशवीत डोकावून  पाहिलं तर आत नोटा आणि चिल्लर भरलेली. म्हणजे ही त्याच्याकडून भूदानाला देणगी होती. मी घाईघाईने ओरडलो- अहो, तुमचं नाव तरी सांगा! तेव्हा ते वळून म्हणाले- अशोक शहाणे. आणि निघून गेले. . .
***
यानंतर खूप दिवसांनी मी शहाणेंना प्रत्यक्ष पाहिलं. मराठी संशोधन मंडळात एक दिवशी सकाळीच डॉ. सु. रा. चुऩेकरांच्या बरोबर ते आले. त्यांनी बिनइस्त्रीचा. थोडा चुरगळलेला काळा शर्ट घातलो होता आणि खाली तशीच गडद रंगाची पॅण्ट होती. बराच वेळ दोघांचं बोलणं चाललं होतं. बोलणं खास वाटत होतं. ते निघून गेल्यावर मी चुनेकरांना विचारलं- कोण हो हे? ते म्हणाले- अशोक शहाणे. नंतर त्यांनी शहाणेंबद्दल बरीच माहिती सांगितली.
पण मराठी साहित्यावर क्ष-किरण टाकण्याची ताकद या माणसात असेल हे मला खरंच वाटेना.
***
त्या काळी संतप्त साहित्यिकांची लघु-अनियतकालिकं जोरात होती. अशोक शहाणे हे या संतप्त साहित्यिकांचे मठाधिपती मानलो जात. या सगळ्यांची प्रस्थापित साहित्यिकांशी कायम खडाजंगी चालू असे. एकदा कोणीतरी पुढाकार घेऊन या लघु-अनियतकालिकांबद्दल संग्रहालयात चर्चा ठेवली. राम पटवर्धन, प्र. श्री. नेरूरकर, अशोक शहाणे, असे अनेक वक्ते होते. बाकी सगळे जण वेळेवर हजर राहिले आणि काय बोलायचं ते बोलले. अशोक शहाणे मात्र आलेच नाहीत. नंतर प्र. श्री. नेरूरकरांनी रविवारच्या मराठ्यात सगळ्यांचा समाचार घेणारा लेख लिहिला. त्यात त्यांनी अशोक खरे शहाणे असा मथळा देऊन त्यांच्या गैरहजेरीची हजेरी घेतली होती.
*** 
याच काळात मी दुर्गाबाईंना भेटायला एशियाटिक सोसायटीत जाऊ लागलो, तेव्हा शहाण्यांशी वारंवार भेटी होऊ लागल्या. मी अर्थात फक्त ऐकण्याचंच काम करत असे. येणार्‍या-जाणार्‍याशी मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगालीत ते बोलत. त्यातला काही भाग मला कळत नसे. पण शहाण्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव आणि त्यांचे उच्चार इतके खास असायचे की बघत आणि ऐकत राहावंसं वाटायचं.
वरवर पाहता शहाणे अबोल वाटतात. पण एकदा बोलायला लागले की तासन् तास बोलतात. पाणिनीचं व्याकरण किती ग्रेट आहे यावर ते एकदा एशियाटिक सोसायटीच्या कॅण्टीनमध्ये तास-दीड तास माझ्याशी बोलले होते. अहो, मग तुम्ही याच्यावर पुस्तक का लिहीत नाही? असं मी विचारल्यावर ते सोड. एवढंच म्हणून त्यांनी तो विषय बंद केला.
***
एकदा मी पुण्याला जात होतो तेव्हा ते आणि त्यांचे परममित्र कृष्णा करवार मला गाडीत भेटले. मग पुढचे चार तास ते दोघं अनेक विषयांवर बोलले. त्यापैकी पुण्याच्या पटवर्धन बंधूंचं सुप्रसिद्ध संगम मुद्रणालय ओरिएण्ट लाँगमनन कंपनीच्या घशात कसं गेलं याची शहाण्यांनी सांगितलेली तपशीलवार हकिगत माझ्या कायमची लक्षात राहिली.
आणखी एकदा माझा मुक्काम पुण्यात होता, तेव्हा रात्रीच्या वेळी ते रस्त्यात दिसले. कुठून आलात? असं विचारलं तर सातार्‍याहून म्हणाले. माझ्या लॉजवर येता का? म्हणालो, तर उत्तर आलं- छे छे! इथे स्वतःचं घर असताना लॉजवर कोण राहील?मग तिथेच फूटपाथवर उभं राहून रात्री साडेदहा-अकरापर्यंत आम्ही गप्पा मारल्या. ते अधूनमधून बाजूच्या पानवाल्याकडून पान घेत होते. त्यामुळे की काय, गप्पा रंगतच गेल्या. . .
*** 
पुढे सांगोपांग वासूनाका नावाचं भलं-भक्कम पुस्तक प्रसिद्ध झालं. भाऊ पाध्येंच्या वासूनाकावर जे काही बरं-वाईट छापून आलं होतं ते सगळं या पुस्तकात एकत्र केलेलं होतं. मी त्यावेळी नवशक्तित होतो आणि या पुस्तकावर अशोक शहाणेंकडून लिहून घ्यावं असं मला वाटत होतं. कारण वासूनाका लिहिताना शहाणेंनी महत्त्वाच्या सूचना केल्या असं भाऊंनी म्हटलेलं होतं.
मी शहाणेंना जाऊन भेटलो. त्यांनी सांगोपांगवर लिहिण्याचं कबूल केलं. पुस्तक ताब्यात घेतलं. अमुक तारखेला मजकूर देतो म्हणाले.
ती तारीख उलटून बरेच दिवस झाले, तरी शहाणेंकडून मजकूर येईना. ते काही ना काही सबबी सांगत राहिले. लिहिलंय पण अजून पक्कं करतोय, आज लिहिलेलं घरी राहिलं, सध्या ते एकाला वाचायला दिलंय, वगैरे. मग एकदा म्हणाले, आता भाऊ पाध्येला वाचायला दिलंय. त्याने बघून दिलं की तुला देतो.
त्यांच्याकडून बाहेर पडलो तर समोर भाऊ पाध्येच भेटले. त्यांना विचारलं तर ते म्हणाले- अशोक थापा मारतोय. चल आपण त्याच्याकडे जाऊ.
तिकडे गेलो तर शहाणे नाहीसे झालेले.
अखेरपर्यंत त्यांच्याकडून ते परीक्षण मिळालं नाहीच.
त्यांनी का लिहिलं नाही, त्यांचं त्यांनाच ठाऊक.
***
मधे दिनांक नावाचं साप्ताहिक चालू होतं. त्याचे पहिले संपादक होते अशोक शहाणे. या साप्ताहिकात दिलीप चित्रेंचं चाव्या नावाचं सदर चालू झालं. त्याची शैली शहाणेंच्या शैलीशी इतकी मिळतीजुळती होती की चित्रेंच्या नावाने स्वतः शहाणेच ते सदर लिहिताहेत असा मला दाट संशय होता- आणि तसं मी शहाणेंना हटकलंही.
पुढे काही दिवसांनी त्या साप्ताहिकाच्या कचेरीत गेलो, तेव्हा शहाणेंनी मुद्दाम त्या सदराचं हस्तलिखित काढून मला दाखवलं आणि विचारलं- बघ, दिलीपचंच अक्षर आहे ना?
मला कबूल करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
*** 
अशोक शहाणे पोटापाण्याचा उद्योग काय करतात?
अनेकांना हा प्रश्न पडतो.
शहाणे पैशांच्या विवंचनेत कधी दिसत नाहीत.
फक्त एकदा ते मला म्हणाले होते- मलाही पुस्तकाची कामं मिळाली तर बघ ना.
मी सहज त्यांना त्यांची अपेक्षा विचारली. तर ती आम्हाला मिळणार्‍या मोबदल्याच्या मानाने इतकी जास्त होती की बोलणंच खुंटलं.
***
काही वर्षांपूर्वी अनिल बांदेकर नावाचा नागपूरकडचा कवी तरूण वयात कॅन्सरने निधन पावला. त्याच्या मित्रांनी त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचं ठरवलं. रमेश पानसे, वासंती मुझुमदार, अशोक शहाणे वगैरेंचा त्यात पुढाकार होता. मौज प्रेसमध्ये संग्रह तयार झाला. प्रकाशन समारंभ ठरला. वासंती मुझुमदारांनी मंगेश पाडगावकरांना अध्यक्ष म्हणून बोलावलं. पोदार कॉलेजमध्ये समारंभ सुरू झाला- आणि पाडगावकर भाषणाला उभे राहताच शहाणे आणि त्यांचे आठ-दहा मित्र अचानक उठून सभा सोडून गेले! पाडगावकर ज्या प्रकारच्या कविता लिहीत होते त्याबद्दलची यांची ही नापसंती होती. पाडगावकरांनी अर्थातच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ते संतप्त नव्हते आणि हे संतप्त होते, हा त्या दोघांमधला फरक होता.
***
शहाणेंच्या तोंडून निरनिराळे किस्से ऐकणं हा एक धमाल अनुभव असतो. गोविंद तळवलकरांबरोबरचा त्यांनी सांगितलेला एक किस्सा असा आहे-
भालचंद्र नेमाडे काही वर्षं इंग्लंडमध्ये होते. ब्रिटिश लोकांचे फार विचित्र अनुभव त्यांना आले. त्याबद्दल कुठे तरी लिहावं अशी नेमाडेंची इच्छा होती. म्हणून शहाणे त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये तळवलकरांकडे घेऊन गेले. पण तळवलकर पडले पक्के ब्रिटिशधार्जिणे. ते म्हणाले, मी इथे संपादक असेपर्यंत तरी ब्रिटिशांच्या विरोधी मजकूर प्रसिद्ध होऊ शकणार नाही.
यावर शहाणेंनी त्यांना हसत हसत काय सुनावलं असेल? ते म्हणाले, तळवलकर, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो, ब्रिटिश १९४७ सालीच हा देश सोडून गेले!’
*** 
मध्यंतरी मॅजेस्टिक बुक स्टॉलचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. त्या निमित्ताने मी प्रकाशन व्यवसायातील निरनिराळ्या लोकांच्या प्रतिक्रिया गोळा करत होतो. शहाणेंनी मला मॅजेस्टिकच्या संबंधातले सहा किस्से सांगितले, आणि वर म्हणाले, तुझी हिंमत असली तर हे सगळं पेपरात छाप.त्यातले तीन किस्से मी त्यांच्या नावाने छापले. उरलेले तीन छापण्याची माझी हिंमत झाली नाही, हे कबूल करायला पाहिजे. आता ते न छापलेले किस्से कोणते होते, हे मला विचारू नका. हिंमत असली तर शहाणेंनाच विचारा!   चार वर्षांपूर्वी आज दिनांक नावाचं सायंदैनिक सुरू झालं होतं. त्याचे पहिले सल्लागार संपादक होते अशोक शहाणे. त्यांच्या पत्रकारितेच्या कल्पना आणि तिथल्या इतरांच्या कल्पना यात इतकी तफावत होती की बर्‍याच वेळा धमाल उडे.
आज दिनांकची कचेरी होती दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये. एक दिवस शहाणे त्या मार्केटमधून कचेरीत येत होते, तेव्हा त्यांना ढीगभर झुरळं मारून टाकलेली दिसली. ते घाईघाईने वर आले आणि तिथे हजर असलेल्या वार्ताहरांना म्हणाले,
खाली मार्केटमध्ये जाऊन या. तुम्हाला काय दिसतंय ते सांगा.
त्या तरुणांचा घोळका मार्केटमध्ये फिरून आला.
काय बघितलंत?’- शहाणे
त्या बिचार्‍यांना बघण्याजोगं खास काहीच दिसलं नव्हतं.
असं कसं? मेलेल्या झुरळांचा ढीग बघितला नाहीत?
हो, पण त्यात काय विशेष. . .
अरे वेड्यांनो, तीच तर मोठी बातमी आहे!
आता यात बातमी काय, ते त्या पोरांना कळेना आणि यांना कसं सांगावं ते शहाणेंना कळेना! ती बिचारी ढीगभर झुरळं जिवानिशी वाया गेली.
***
गेल्या वर्षी आम्ही समकालीन संस्कृती नावाचं मासिक सुरू केलं. त्याच्या दिवाळी अंकात मी मौजेचे दिवस नावाचा मोठा लेख लिहिला. त्याची थोडीफार चर्चा झाली. मी लगेच हवेत तरंगू लागलो. मौज प्रकाशनाबरोबर शहाणेंचे संबंध बरीच वर्षं बिघडलेले आहेत- त्यामुळे त्यांना हा लेख वाचायला आनंद वाटेल, अशा समजुतीने मी तो अंक मुद्दाम त्यांना नेऊन दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्सुकतेने त्यांना फोन केला-
काय, बघितलात का अंक?
ते म्हणाले, हां- तुमच्या अंकातली ती प्रदीपने घेतलेली दिलीपची मुलाखत चांगली आहे.
पण माझा लेख बघितलात का?
नाही. . . तो नाही अजून बघितला. मग दोन दिवसांनी मी पुन्हा विचारलं- माझा लेख बघितलात का?
त्यांचं उत्तर तेच- नाही अजून.
तो अभिप्राय अत्यंत बोलका आणि अविस्मरणीय होता! हवेत तरंगणार्‍या मला त्यांनी अतिशय अलगद जमिनीवर आणलं होतं.

ग्रंथनिर्मितीचे 'शहाणे' कवतिक

- सुनील कर्णिक

('दिव्य मराठी'च्या 'रसिक' ह्या रविवारच्या पुरवणीमध्ये १०.७.११ रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)



पुस्तके कशी तयार होतात, याचे सुप्त कुतूहल अनेक वाचकांच्या मनात असते. त्याविषयीची एक खास चर्चा मुंबईतल्या ‘संवाद’ संस्थेने २१ जूनच्या संध्याकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात ठेवली होती. व्याख्याते होते प्रास प्रकाशनाचे चालक अशोक शहाणे. वय वर्षे ७५. ते अनुवादक, भाष्यकार, संतप्त साहित्यिकांचे मठाधिपती, आदी विशेषणांनी प्रसिद्ध आहेतच; पण त्यांनी मुद्रणालयांत काम केले आहे आणि त्यांच्या प्रास प्रकाशनाच्या पुस्तकांची निर्मिती अत्यंत लक्षवेधक असते. म्हणूनच त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी शंभर-एक चोखंदळ वाचक आवर्जून उपस्थित होते. शहाण्यांचे व्याख्यान सणसणीत, खणखणीत आणि अत्यंत ऐकण्याजोगे असणार याबद्दल त्या सर्वांची जणू खात्री होती. शहाण्यांनी अर्थातच त्यांची निराशा केली नाही. ते म्हणाले : ‘पुस्तकं छापणं हे तसं सोपं काम असतं. छापखानेवाले असतातच; त्यांच्याकडे हस्तलिखित नेऊन दिलं की पुस्तक छापून मिळतं. पण हा सरधोपट मार्ग झाला. आता बोरिवलीला शब्द प्रकाशन आहे. ते ‘मुक्त शब्द’ नावाचा अंक काढतात. त्याचं हस्तलिखित मौज प्रेसमध्ये नेऊन दिलं की झालं. मग त्यात प्रकाशकाचा आणखी काही सहभाग नाही. आपले पॉप्युलरपासूनचे सर्व प्रकाशक असे आहेत. हस्तलिखिताला धरून नेमकं काय करावं हे कोणालाच कळत नाही. त्यामुळे त्यांची सगळी पुस्तकं सारखी दिसतात. पण आम्ही असे छापाचे गणपती तयार करत नाही. आमचा प्रत्येक गणपती हाताने तयार केलेला असतो.
खरं म्हणजे प्रत्येक हस्तलिखिताचं छापील स्वरूप आधी प्रकाशकाच्या डोक्यात तयार व्हावं लागतं. मग बाकी सगळी हमालकी असते. हस्तलिखितापासून पुस्तक तयार होईपर्यंत कामांची प्रचंड साखळी असते. दरेक टप्प्यामध्ये आपल्या डोक्यामधल्या पुस्तकाचा शार्पनेस कमी होत जातो. आमचे मुद्रक मित्र कृष्णा करवार म्हणायचे तसं - पुस्तकाचं बाळंतपण करावं लागतं. त्यात शाईबरोबर थोडा जीव घालावा लागतो.
पुस्तकाची निर्मिती म्हणजे टीमवर्क असतं. त्यात डझनभर लोकांचा हात लागलेला असतो. उगाच प्रकाशकांनी मिरवू नये. काम बिघडवण्याचे सर्वाधिकार मुद्रकाकडे असतात. बाइंडर हा आधीच्या सर्व कामावर पाणी फिरवू शकतो हे इतरांनी लक्षात ठेवावं. साध्या अंकलिपीचा विचार गेल्या दीडशे वर्षांत आपण केलेला नाही. क ख ग घ ङ् हा अक्षरांचा गट कोणी पाडला? तर बहुधा छापखान्याच्या फोरमनने. पण मराठीत छापलेली पहिली अंकलिपी आपण जतन केलेली नाही. आता पुस्तकाच्या कागदाचं पाहूया. बाजारात काही आकारांचे कागद मिळतात. डेमी, क्राउन, रॉयल, फुलस्केप वगैरे. कागदाच्या मोठ्या रिळातून ते कापून काढावे लागतात. ‘ग्रंथ’ म्हणजे ‘गाठ मारलेले, बांधलेले’ कागद. लिहिलेले किंवा छापलेले कागद बांधून काढले की त्यांचा ग्रंथ होतो.
छापलेल्या मोठ्या कागदाची ४ च्या पटीत घडी घालतात. म्हणून १६ पानांचा फॉर्म. यंत्रावर तशी रचना करण्यासाठी पूर्वीच्या छापखान्यामध्ये ठरावीक लाकडी फर्निचर असे. आपण १२ पानी फॉर्मचा आग्रह धरला की मुद्रकाला ते फर्निचर तोडावं लागे, म्हणून तो अशी वेगळी रचना करायला नाखूष असे. पण ‘अरुण कोलटकरच्या कविता’ छापताना अम्ही पुस्तकाचा वेगळा आकार नक्की केला. कसा? तर त्यातल्या सर्वात मोठ्या ओळीची लांबी मोजली. त्यावरून पुस्तकाची रुंदी ठरली. मग प्रत्येक कविता जास्तीत जास्त दोन पानांतच बसली पाहिजे हे नक्की केलं. त्यावरून पुस्तकाची उंची ठरली. आता या आकारासाठी कागदाचा ३६ पानी फॉर्म सोयीचा होता. पण त्याचं बार्इंडिंग करता येईल का, ही शंका होती. पण तेही जमेल असं दिसलं. मग त्याप्रमाणे पुस्तक आकाराला आलं.
पण ‘मौजे’च्या विष्णुपंत भागवतांना आम्ही हे सांगितलं तर ते म्हणाले, ३६ पानी फॉर्म होईल कसा? तर तो होतो. आपण हवे तेवढे आकार करू शकता. पण हे फार कोणाच्या डोक्यात आलेलं दिसत नाही. अर्थात त्यातही काही गैर नाही.
‘भिजकी वही’, ‘माझी कहाणी’, ‘जेजुरी’ अशा आमच्या प्रत्येक पुस्तकाची स्वतंत्र कहाणी आहे. ‘भिजकी वही’चं मुखपृष्ठ आम्ही काळ्या रंगात छापलेलं आहे. आतल्या ‘आसपास’च्या एन्ड पेपरचा कागदही काळा आहे. त्या पुस्तकाचे गठ्ठे बांधणा-या   प्रेसमधल्या माणसाला राहवेना म्हणून तो म्हणाला, ‘काय दिसतंय पुस्तक!’ असं साध्या वाचकांनी पुस्तकाचं डिझाइन वाचायला शिकलं पाहिजे. पण त्याची सौंदर्याची दृष्टी वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. डिझाइनची दृष्टी असलेले लेखकही फार कमी आहेत.
आपले प्रकाशक पुस्तकाचा मजकुराजोगता चेहरा शोधून काढत नाहीत. तशी पुस्तकाची मांडणी कैक प्रकारांनी करता येते. पण ती एका वेळी एकाच प्रकाराने करावी लागते. ती दगडावरची रेघ आहे. कव्हरमुळे पुस्तक अजिबात ठरत नाही. कव्हर हे बासन असतं. तो दर्शनी चेहरा असतो. आतील मजकूर हे पुस्तक असतं. कव्हर आणि मजकूर यांत साम्य असायला हवं. काही प्रमाणात एकसंधपणा हवा. असा प्रयत्न जाणूनबुजून केल्याशिवाय काही होत नाही.
तसा भाषा आणि लिपी यांचा फार विचार मराठी लोकांनी केलेला नाही. आता अक्षरजुळणीसाठी मराठीत ३५०-३७५ कॅरॅक्टर्स आहेत, तर इंग्रजीत ती शंभरच आहेत. (म्हणून मराठी अक्षरजुळणीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात) सावरकरांनीसुद्धा वेगळी लिपी शोधून काय केलं, तर मराठीतली ३-४ कॅरॅक्टर्स कमी केली. त्यांच्यासारख्याला स्वर आणि व्यंजन यांच्या विभागणीतलं गमकच कळू नये हे आश्चर्यकारक आहे. मला ते सगळं काम सेन्सलेस वाटतं.
आपण आता ‘आयटी’च्या क्रांतीच्या बढाया मारतो, ते खोटं आहे. अजून शब्द, अक्षर यांची व्याख्या कॉम्प्युटरला समजावून सांगणं आपल्याला जमलेलं नाही. खरं म्हणजे काळ्यावरचं पांढरं अक्षर वाचायला उत्तम असतं. पण त्याच्यासाठी शाई बरीच खर्च होते, म्हणून तसं केलं जात नाही. आम्ही सर्वाधिक कवितासंग्रह छापले. आमच्या ‘प्रास’च्या पुस्तकांना इंग्लंड, अमेरिका, फ्रान्समधल्या प्रकाशकांनीही दाद दिली आहे. कारण त्यांची पुस्तकं स्वत:चा चेहरा घेऊन येत नाहीत. ती एकसारखी दिसतात. खरं तर प्रत्येक पुस्तक स्वत:चं अंग घेऊन जन्माला येत असतं.अशा अनेक कारणांमुळेच मराठीला आज वाईट दिवस आहेत. मराठीतलं इतरांचं एकही पुस्तक मला आजवर आवडलेलं नाही. पण असं बोलणं म्हणजे बढाया मारल्यासारखं होतं; म्हणून बोलायचं नाही.’

मैत्र