१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Sunday, November 7, 2010

लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीसंबंधी

- अशोक शहाणे

'अबकडइ' या चंद्रकान्त खोत यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकात १९७०च्या दरम्यान हा लेख प्रसिद्ध झाला होता. लिट्ल मॅगझिन्सच्या घडामोडींशी संबंधित मंडळींना एक प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून आलेले लेख या अंकात होते. लेखासाठीची मूळ प्रश्नावलीही खाली दिली आहे. त्या अंकातला हा लेख. 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या 'नपेक्षा' या शहाण्यांच्या पुस्तकातही हा लेख वाचायला मिळू शकेल.
__________________

१. तुम्हाला एखादे लिट्ल मॅगझिन काढण्याची गरज का भासली?
२. लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीचा लढा एस्टॅब्लिशमेंटविरुद्ध असल्यास त्यात नेमके काय करणे तुम्हाला अभिप्रेत आहे? गुळमुळीत न लिहिता स्पष्टपणे मांडा.
३. आजकाल बंडखोर पिढी, संतप्त पिढी असा शब्दप्रयोग करण्यात येतो. तुम्ही स्वत: यात समाविष्ट आहात काय? असल्यास तुमच्या बंडखोरीचा किंवा संतप्तपणाचा पुरावा काय?
४. मराठीतील लिट्ल मॅगझिन्सविषयी आजकाल जी टीका करण्यात येते, उदाहरणार्थ : यात काहीच क्रिएशन नाही, लिट्ल मॅगझिन्स कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे आहेत, या चळवळीतील लोक एग्झिबिशनिस्ट आहेत वगैरे वगैरे. तर या बाबतीत तुमचे स्पष्ट मत मांडा.
५. इतर भारतीय भाषांतील लिट्ल मॅगझिन्सच्या चळवळीच्या तुलनेने मराठीतील चळवळी संबंधाने तुम्हाला काय वाटते?
६. मराठीतील लिट्ल मॅगझिन्सच्या या चळवळीचे भवितव्य काय?
__________________

गोष्टी आपल्या घडतच असतात. आपण त्यातल्या एखादीत सापडतो. दरवेळी एखादीतच. आपण तिच्या वाटेत पडत असू. किंवा आपला कल असेल तसा. मग काही वेळा आपल्या पण हातातून गोष्टी घडत राहतात. मारे जोरातदेखील. अन् आणखी नंतर परत थंडपणा येतो.

इतक्यात योगायोगानं नाना काकतकरांशी गाठ पडली. त्यांना रवींद्रनाथांच्या जन्मशताब्दीला खास अंक काढायचा होता. बंगाली जाणणारा म्हणून माझा प्रमाणाबाहेर बोलबाला झालेला. तेव्हा तो अंक त्यांना जमवून दिला अन् लगेच दोनतीन महिन्यात सदू रेगे विलायतेला चालला. तेव्हा रहस्यरंजनाची जिम्मेदारी माझ्याकडेच आली. अंकात काय काय पाह्यजे हे मला आपोआपच कळायचं. इतका मजकूर ठरला, आता आणखी इतका न् असा असा जमला की हा अंक होईल, वगैरे सहजगत्या लक्षात असायचं. त्यात माझी कर्तबगारी काहीच नव्हती. पण तरी अंक बरे निघाले बहुतेक. कारण काकतकरांनी तेवढ्यावरच खूष होऊन 'अथर्व'ची टूम पास केली. अन् पहिला अंक भलताच सुबक निघाला पण. आता त्याच सुमाराला 'रहस्यरंजन'चे पाय लटपटावेत अन् 'अथर्व'चा पहिला अंक शेवटलाच ठरावा - हे कुणाच्याच मनात नसलेलं होऊन बसलं.

एवढ्यावरच मी आपला मुंबैहून पुण्याला जाऊन घरी जवळपास हरीहरी करत बसलो होतो, तर 'अथर्व' छापणारे कृष्णा करवार न् 'अथर्व'वर चित्र काढून देणारे वसंत सरवटे ह्यांचा एक निरोप आला. परत काहीतरी काढा की. आपलं डोकं तर चालायचंच. तेव्हा 'असो'ची सुरुवात अशी झाली.

हे भलतंच गुळमुळीत वाटेल कदाचित. पण झालं ते निव्वळ असं. आम्हाला तर लिट्ल मॅगझिन म्हंजे काय माहीत नव्हतं. बाकीच्या मासिकातनं येणा-या गोष्टी-कवितांत काहीतरी एक नाही असं ठाम माहीत होतं. ते दुसरीकडे-नसलेलं-काहीतरी 'अथर्व-असो'मधनं हळूहळू आकार घेतंय अशी प्रामाणिक समजूत होती. त्याचं पुढं काय झालं असतं कोण जाणे. तितकी वेळच आली नाही.

पण म्हंजे हा लढाबिढा नव्हता. एस्टॅब्लिशमेंट वगैरे चौकटीत डोकं बसवून घ्यायला मी तरी तयार नव्हतो. तशी आमच्या हौसेला फारशी परदेशी पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळं तिकडले वाद, प्रश्न वगैरेंची डोकेदुखी कोण विकत घेणार. पण तरी चालू साहित्यातील जिवंतपणाची गैरहजेरी खटकत होती एवढं मात्र खरं. चालू साहित्याचा उदोउदो करणा-या लोकांच्याबद्दल एक प्रकारे कीव वाटायची पहिल्यांदा. पण ती काही त्यांच्या लक्षातच आली नाही वाटतं. कारण त्यांनी आपलं काहीच सोडलं नाही. मग जरासा राग पण आलाच. त्यांच्या बिनडोकपणाबद्दल. पण तेव्हा तरी ते तेवढ्यावरच राह्यलं.

ही प्रतिष्ठित मंडळी निव्वळ साहित्यासारख्या निरुपद्रवी प्रांतातच नाही तर छापखान्यासारख्या उपयोगी प्रांतात पण ठाण मांडून बसलेली आहेत. अन् शक्यतर ती आपल्याला काही छापून काढायला मज्जाव पण करतील वगैरे इतक्या गोष्टी अजिबातच डोक्यात आल्या नाहीत. प्रत्यक्षात तशा प्रसंगाशीच गाठ पडावी लागली. मग मात्र लगेच साहित्याचा निरुपद्रवीपणा पळाला. प्रतिष्ठित मंडळींच्या भलेपणाचे बंगले पण कोलमडून पडले.- थोडक्यात म्हंजे आम्ही कधीच जाणूनबुजून प्रतिष्ठितांच्या वाटेला गेलो नाही. तेच आमच्या वाटेला गेले. पहिला शहाणपणाचा धडा त्यांनी दिला. डोळे उघडले.

जसंजसं बघत जावं तसतशा ह्या मंडळींनी वाटा रोखलेल्या दिसत गेल्या. दरम्यान 'असो' तर बंदच करून ठेवलं होतं. कारण एखादी वाट मोकळी शोधून ते काढत पण राहता आलं असतं. पण त्यात स्वारस्य नव्हतं. कारण एव्हाना कळून चुकलं होतं की एवढ्यानं त्यांना ढिम्मदेखील होत नाही. ह्यांचे खुंटे साहित्याव्यतिरिक्त छप्पन ठिकाणी रोवलेले असतात. अन् ते ढिले केल्याखेरीज काही मोकळेपणा यायचा नाही. ही गोष्ट मला जेवढी स्पष्ट दिसते आहे ती अशी :

धरा कॉलेजातला एक पोरगा. प्रत्येक कॉलेज वर्षातनं एक अंक काढतं. त्याचा संपादक असतो कुणीतरी एक प्राध्यापक. बाकी मुलांचा एक अन् मुलींचा एक असे प्रतिनिधी पण असतात मंडळावर. हे बहुतेक भलतेच आज्ञाधारक. त्यामुळं अंक जसे निघतात तसे निघतात. प्रत्यक्षात कॉलेजातली मुलं वेगळी असतात. म्हंजे ह्या अंकात काय छापायचं ह्याची एक पठडी ठरून गेलेली आहे. त्यात बसणारं काही तुम्ही दिलंत तर छापलं जाईल. नाहीतर नाही. बाहेर तुम्ही आपलं असं एखादं अ-नियतकालिक काढून त्यात ते खुशाल छापा. कॉलेज चालवणारे लोक काही म्हणणार नाहीत. पण तुम्ही पैसे भरलेल्या न् कॉलेजच्या नावानं निघणा-या अंकात ते येणार नाही. एवढं तुम्हाला सोयीचं असलं तर त्यात त्यांची पण सोयच आहे. पण हीच गोष्ट तुम्हाला सोयीची नसली तर तुम्ही काय करता? तुम्ही कॉलेजचा अंक पोरांच्या ताब्यात द्या म्हणून आरडाओरडा केलात की ही साव मंडळी खवळतात की नाही पहा. असेच एकेक मोर्चे त्यांनी बांधलेले आहेत.

म्हंजे तुम्ही कविता लिहिल्यात तर ते तुम्हाला बक्षीसदेखील देऊ करतील. एका अटीवर. तुम्ही एखाद्या कचेरीत काम करत असाल तर तिथले साधे हिशेब तुम्ही मराठीत न लिहिता इंग्रजीत लिहिले पाहिजेत. कारण तुमची भाषा कविता लिहिण्याइतकी पुढारलेली असली तरी हिशेब लिहिण्याइतकी पुढारलेली नाही.

अशा रीतीनं एकदा का तुम्हाला कामाच्या ठिकाणी कुचकामी करून टाकलं की मग साहित्याच्या क्षेत्रात तुम्ही थोडाफार धुमाकूळ घातला तर चालेल असं सरकारी धोरण आहे. अशानं साहित्याचं क्षेत्र आहे त्यापेक्षा निर्जीव बनत चाललं तर त्याचं काय एवढंसं. देश तर प्रगतीच करत राहील अन् साहित्याची बक्षिसं तेवढी वाढवली की प्रश्न मिटला. अन् हे बहुतेक लोकांना कबूल आहेसं दिसतं. 'आत्ता', 'फक्त', 'तापसी', येरू', 'श्रीशब्द', टिंब', 'अबकडइ' वगैरे चाळून बघा. जो तो कामाच्या जागी निमूट अन् बाहेर ह्या अंकातनं बंडखोर आहे. अन् ही एवढी बोलाची बंडखोरी त्याला समाधान देते. मला वाटतं, श्री. पु. भागवत हसत असतील हा प्रकार बघून गालातल्या गालात.

मग उघडच आहे की ह्यातल्या कुणी साहित्याबद्दल वेगळी भूमिका मांडलीच नाही. एक अपवाद 'वाचा'मधला नेमाडेचा लेख. त्यात पेच तरी स्वच्छ मांडलेला होता. असं काहीच उदाहरणार्थ, राजा ढाले आणि मंडळींच्या हातनं झालं नाही. ते विशेष नाही. पण त्यांना त्याची गरजच वाटली नाही. टीकावजा त्यातल्यात्यात राजानंच लिहिलं म्हणून त्याचा उल्लेख. राजानं आणखी एक जबरदस्त केलं. स्वत:च्या संपादनाखाली निघणा-या अंकांतच असली टीका छापली. बाहेरचे लोक तर बोलूनचालून जयवंत दळवींसारखे. तर कुणी एग्झिबिशनिस्ट वगैरे म्हणालं असेल तर नवल नाही.

दुस-या भाषांत हे काय कितपत चाललंय नीट कल्पना नाही. पण बंगाली लोकांच्यात जोश आपल्या दसपटीनं हे खरंच. वाराणसीचं 'आमुख' तर एकदम लालभडक झालेलं दिसतंय. म्हंजे ह्यांची बोलाची बंडखोरी प्रत्यक्षात येत चालली तर अशीच होणार की काय? मराठीत तर तूर्त सामसूम आहे. डोळे उघडे ठेवून का मिटून हा प्रश्न आहे.

पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही. एकामागोमाग एक- किंवा एकाबरोबर एक- अशी अनियतकालिकं निघत गेली. कारण 'असो' निघालं अन् अनियतकालिकं काढता येतात हे लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी पण काढली. पैशाच्या पाठबळाच्या प्रमाणात ती चालली, बंद पडली. एरवी त्यांच्यातनं काही निष्पन्न झालं असं तर काही वाटत नाही. ह्याच प्रकारानं निघत राहिली तर कुणाचं काही बिघडणार तर अर्थातच नाही. वेगळ्या प्रकारानं निघत राहिली तर मात्र रंगत येईल एवढं खरं.
***



शांताबाई किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समूहाकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या 'किर्लोस्कर', 'मनोहर', 'स्त्री' या तीन मासिकांचा इतिहास 'कथा पासष्टीची' या पुस्तकात लिहिला आहे. या पुस्तकामधे शहाण्यांचा हा फोटो सापडला. फोटोचा इतर तपशील मात्र सापडू शकला नाही. शहाण्यांच्या बोलण्यात आल्यानुसार मुंबईमधे कुठल्यातरी कॉलेजात आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळचा हा फोटो असावा. पण तरीही फोटोचे संदर्भ अस्पष्टच आहेत.

No comments:

Post a Comment

मैत्र